Shami apologize to BCCI and Fans: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली. या घोषणे नंतर टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागितली आहे. मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत माफी मागितली आहे. स्टार खेळाडूची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले की त्याने असे का केले. मोहम्मद शमीने अशी पोस्ट का शेअर केली यांबद्दल जाणून घेऊयात.
खरतरं, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चाहत्यांची आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माफी मागितली, कारण बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. शमीला अद्याप मॅच फिटनेस गाठता आलेला नाही, त्यामुळे आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
शस्त्रक्रियेनंतर शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याचे 'पुनर्वसन' पूर्ण केले. पण गुडघ्याला सूज आल्याने शमीच्या पुनरागमनाची योजना रखडली होती. मात्र, शमीने नुकतेच जाहीर केले होते की, त्याला कोणतीही वेदना होत नाहीयेत. मात्र, आता त्याने इंस्टाग्रामवर आपल्या ट्रेनिंगचा एक व्हिडीओ पोस्ट करून लवकरच पुनरागमन करणार असल्याचे सांगितले.
34 वर्षीय गोलंदाज मोहम्मद शमी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहतो की, 'मी दिवसेंदिवस माझ्या गोलंदाजीचा फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. सामन्यांच्या तयारीसाठी आणि देशांतर्गत लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी मी कठोर परिश्रम करत राहीन. मी सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयचीही माफी मागतो. पण लवकरच मी लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यास तयार होत आहे. तुम्हा सगळयांना प्रेम .
नोव्हेंबरमध्ये घोट्याला दुखापत झाल्यानंतर शमी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलपासून खेळात दिसत नाही. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दुखापतीनंतर शमी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध बंगालच्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच तो टीम इंडियात पुनरागमन करू शकेल.