नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी भोगत असलेला भारताचा क्रिकेटपटू एस.श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. २०१३ साली आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी संपर्क केला होता, तेव्हा त्यानं लगेच याबद्दल बीसीसीआयला माहिता का दिली नाही. श्रीसंतचं वागणं चुकीचं होतं, असं सर्वोच्च न्यायालयानं खडसावलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयनं श्रीसंतवर कायमची बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयानं या बंदीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर श्रीसंतनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. बीसीसीआयनं घातलेली बंदी जास्त कठोर आहे, आणि स्पॉट फिक्सिंगबद्दल कोणताही पुरावा नसल्याचा युक्तीवाद श्रीसंतच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
सलमान खुर्शीद यांनी न्यायालयामध्ये श्रीसंतची बाजू मांडली. मे २०१३ साली मोहालीमध्ये राजस्थान आणि पंजाब यांच्यामध्ये झालेल्या मॅचदरम्यान स्पॉट फिक्सिंग झाल्याचा कोणताही पुरावा नाही. तसंच याबदल्यात श्रीसंतला पैसे मिळाल्याचाही पुरावा नसल्याचं खुर्शीद सर्वोच्च न्यायालयात म्हणाले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी खुर्शीद यांना रेकॉर्ड करण्यात आलेल्या टेलिफोन संभाषणावरही प्रश्न विचारले. श्रीसंतनं याबद्दलची माहिती लगेचच बीसीसीआयला का दिली नाही? असा सवाल खंडपीठानं उपस्थित केला. श्रीसंतनं बीसीसीआयला याबाबत माहिती दिली नाही, तरी याबद्दलची शिक्षा ५ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये, असं उत्तर सलमान खुर्शीद यांनी दिलं.
सलमान खुर्शीद यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर खंडपीठ म्हणालं की 'या सगळ्या घटनादरम्यान श्रीसंतचा व्यवहार योग्य नव्हता. याबाबत कोणताच संशय नाही'. श्रीसंतचा बचाव करणारे सलमान खुर्शीद म्हणाले 'या आरोपांच्या आधारे स्पॉट फिक्सिंगसाठी श्रीसंतला त्या ओव्हरमध्ये १४ रन द्यायचे होते, पण १३ रनच करण्यात आले. त्यावेळी मैदानात जगातले सर्वोत्तम समजले जाणारे बॅट्समन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श होते'.