T20 World Cup : ईशान किशनला ओपनिंगला का पाठवलं? समोर आलं कारण

टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते

Updated: Nov 2, 2021, 07:57 PM IST
T20 World Cup : ईशान किशनला ओपनिंगला का पाठवलं? समोर आलं कारण title=

मुंबई : टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत टीम इंडियाला (Team India) पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) अशा सलग दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या बॅटिंग ऑर्डरवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सामन्यात ईशान किशनला (Ishan Kishan) ओपनिंगला पाठवण्यात आलं, तर रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याचा निर्णय कोणाचा होता याचं कारण आता समोर आलं आहे. (Why Rohit Sharma was demoted in India's crucial WC match against NZ?)

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बॅटिंग कोच विक्रम राठोड (Batting Coach Vikram Rathour) यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतग्रस्त होता, सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदरुस्त नव्हता. त्यामुळे ईशान किशनला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला. आणि निर्णयात रोहित शर्माचाही समावेश होता, असं राठोड यांनी म्हटलं आहे.

ईशान किशनने आयपीएलमध्ये (IPL 2021) ओपनिंग फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली होती. याशिवाय टी20 विश्वचषकातील सराव सामन्यातही ईशान किशनने ओपनिंगला येत धडाकेबाज फलंदाजी केली. यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ओपनिंग फलंदाज म्हणून ईशान किशनला पसंती देण्यात आल्याचं विक्रम राठोड यांनी स्पष्ट केलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ईशान किशनला के एल राहुलबरोबर ओपनिंगला पाठवण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकवर तर विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण भारताची टॉप ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरली होती. केवळ 50 धावांमध्ये टॉपचे 4 फलंदाज बाद झाले.

रोहित शर्माला ओपनिंला का पाठवण्यात आलं नाही यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या भारताच्या आशा कमी झाल्या आहेत. उर्वरित तीनही सामने भारतीय संघाला मोठ्या अंतराने जिंकावे लागणार आहेत.