मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पण कसोटी मालिकेआधीच विकेटकीपर ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात खळबळ उडाली होती. पण आता कोरोनावर मात करत ऋषभ पंत पूर्णपण फिट झाला असून भारतीय संघात परतला आहे. लंडनहून डरहॅम इथं पोहचलेल्या पंतचं टीम इंडियाने जंगी स्वागत केलं. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी पंतला फुलांचा हार घातला.
काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर पंत लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन होता. त्यामुळे डरहॅमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाऊ शकला नाही. आता क्वारंटाईन संपवून ऋषभ पंत संघात परतल्याने भारतीय संघात आनंदाचं वातावरण आहे.
ऋषभ पंतने आपल्या स्वागताचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत आणि त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'हार के बाद ही जीत है और जीतने वाले को बाजीगर कहते है.' ऋषभ पंतने शेअर केलेल्या फोटोत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर भारतीय खेळाडूही दिसत आहेत.
हार के बाद ही जीत है और जितने वाले को कहते है बाज़ीगर
Thrilled to be back. Thank you @RaviShastriOfc for this grand welcome pic.twitter.com/qy8QN2waqv— Rishabh Pant (@RishabhPant17) July 22, 2021
4 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात
भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून सुरु होणार असून नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे.