इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला न ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलाच महागात पडला आहे. भारत आणि पाकिस्तान मॅच सुरु होण्याआधी इम्रान खान यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज याला टॉस जिंकून पहिले बॅटिंग घ्यायचा सल्ला दिला होता. पण सरफराजने हा सल्ला न ऐकता पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.
सरफराजने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताने पाकिस्तानपुढे रनचा डोंगर उभारला, आणि पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या काही ओव्हरमध्ये संयमी खेळी केल्यानंतर दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. राहुल आणि रोहित यांच्यामध्ये १३६ रनची पार्टनरशीप झाली.
केएल राहुलने ७८ बॉलमध्ये ५७ रन केले. राहुलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटच्या मदतीने रनची गती कायम ठेवली. ११३ बॉलमध्ये १४० रन करुन रोहित शर्मा माघारी परतला. रोहितच्या या खेळीमध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं.
रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता, पण टीम इंडियाच्या दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. हार्दिक पांड्या १९ रनवर आणि धोनी १ रनवर आऊट झाला. यानंतर पावसाचा व्यत्यय आला. पावसानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर विराट कोहलीनं विकेट गमावली. विराटने ६५ बॉलमध्ये ७७ रन केले.