सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान संघाचे दोन खेळाडू वगळता सर्व खेळाडू पहिल्यांदाच भारतात आले आहेत. याआधी मोहम्मद नवाज आणि आगा सलमानच भारतात आले आहेत. कर्णधार बाबर आझमचाही हा पहिलाच दौरा आहे.
हैदराबादला पोहोचल्यानंर पाकिस्तानी खेळाडू आता सराव सुरु करणार आहेत. पाकिस्तान संघ 29 सप्टेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात न्यूझीलंडविरोधात आपला सराव सामना खेळणार आहे. यानंतर दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरोधात असणार आहे. हा सामनाही हैदराबादमध्येच होणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह आपल्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. पाकिस्तान संघाचे हे दोन्ही सामनेही हैदराबादमध्येच होणार आहेत.
A warm welcome in Hyderabad as we land on Indian shores #WeHaveWeWill | #CWC23 pic.twitter.com/poyWmFYIwK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 27, 2023
यादरम्यान पाकिस्तान संघाने सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिरकी गोलंदाजांची मागणी केली आहे. तसंच पाकिस्तान संघाने सरावासाठी जास्तीत जास्त खेळपट्ट्या उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. भारतीय खेळपट्टींवर फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळत असल्यानेच पाकिस्तानी खेळाडूंना फिरकी गोलंदाजांविरोधात जास्त सराव करायचा आहे. पाकिस्तान खेळणार असणाऱ्या हैदराबादमधील खेळपट्टीही काही वेगळी नाही. मिळालेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला सरावासाठी 7-7 खेळपट्ट्या देण्यात आल्या आहेत.
बाबर आझम (कर्णधार) शादाब खान (उप-कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमां, हसन अली, इफ्तिखार अहमद , इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सऊद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होत आहे की, जेव्हा संपूर्ण वर्ल्डकप भारतात खेळला जाणार आहे. याआधी भारताने 1987, 1996 आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. एकूण 46 दिवस ही स्पर्धा सुरु असणार आहे.
5 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामन्यासह वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तसंच भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नईत खेळणार आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना होणार आहे.