World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने आपल्या सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरीची नोंद केली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी या सामन्यात काही रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. एकीकडे या विजयासह भारताने सेमी-फायनमधील आपला प्रवास आणखी सोपा केला आहे. पण या सामन्यातील एका घटनेमुळे मात्र भारतीय संघ चिंतेत आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी झाल्याने भारतीय संघाला चिंता सतावत आहे. पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयातन नेलं आहे.
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने विजयावर भावना व्यक्त करताना हार्दिक पांड्याची दुखापत कितपत गंभीर आहे याचीही माहिती दिली. "हा एक चांगला विजय होता. अशाच विजयाची आम्हाला अपेक्षा होती. आमची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. पण गोलंदाजीतील मधील ओव्हरमध्ये आणि शेवटी आम्ही पुनरागमन केलं. गेल्या तिन्ही सामन्यात आमचं क्षेत्ररक्षण उत्तम राहिलं आहे. आजही आम्ही तेच कायम ठेवलं. ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर तुमचं नियंत्रण असतं. तुम्ही येथे जास्तीत जास्त मेहनत घेऊ शकता. आपण अशी गोलंदाजी केली पाहिजे याची गोलंदाजांना जाण होती," अशा शब्दांत रोहित शर्माने कौतुक केलं.
"जाडेजाने उत्तम गोलंदाजी केली. तसंच त्याने जबरदस्त कॅचही घेतली. पण विराटचं शतक अशी गोष्ट आहे, ज्याच्याशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही," असं रोहितने सांगितलं. तसंच प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्याला मेडल दिलं जाण्यासंबंधीही रोहित शर्माने सांगितलं. तो म्हणाला की, आमच्या संघात काहीतरी सुरु आहे. यामुळे सर्वांना चांगलं खेळण्याचं बळ मिळतं. ज्याला शेवटी सर्वाधिक मेडल्स मिळालेले असतील त्याच्यासाही काहीतरी विशेष असणार आहे.
हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर बोलताना रोहित शर्माने सांगितलं की, "त्याला थोडी दुखापत झाली आहे. पण दुखापत जास्त गंभीर नाही ही दिलासा देणारी बाब आहे. पण अशी दुखापत असेल तर तुम्हाला रोज आढावा घेण्याची गरज असून, आम्ही गरज असणारी प्रत्येक गोष्ट करत आहोत. न्यूझीलंडविरोधातील सामना मोठा असणार आहे. संघातील प्रत्येकाला दडपणाखाली खेळण्याची सवय आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आमच्यासाठी ही विशेष बाब आहे. प्रेक्षकांना आम्ही नाराज केलेलं नाही आणि यापुढेही मोठी कामगिरी करु अशी अपेक्षा आहे".
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पहिल्या जोडीने 91 धावांची भागीदारी करत निर्णय सार्थ ठरवला होता. पण यानंतर बांगलादेशचे विकेट्स एकामागोमाग तंबूत परतत राहिले. अखेरच्या काही फलंदाजांच्या जोरावर बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 256 धावा केल्या. रवींद्र जाडेजा, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.
257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावा करत दमदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनेही 53 धावा ठोकल्या. यानंतर विराट आणि के एल राहुलने संघाला विजयापर्यंत नेलं. विराटने यावेळी 78 वं शतक ठोकलं. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.