Kusal Mendis On Loosing Against India by 302 Runs: मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर गुरुवारी झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय अगदीच अंगलट आला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर शुभमन गील आणि विराट कोहलीने अर्धशतकं झळकावली. दोघांनी 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप केल्यानंतर श्रेयस अय्यरनेही तुफान फलंदाजी कर भारताला 357 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी मदत केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी, मोम्मद सिराज, जसप्रीत बुमराहच्या भन्नाट गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेला केवळ 55 धावांवर बाद केलं आणि सामना 302 धावांनी भारताने हा सामना जिंकला. या पराभवासहीत श्रीलंकन संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडला आहे. या पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडीस फारच निराश झाला आहे.
सामन्यानंतर बोलताना कुशल मेंडीसने, "मी स्वत:च्या आणि संघाच्या कामगिरीमुळे निराश झालो आहे. भारताने फार उत्तम गोलंदाजी केली. उजेड असतानाही चेंडू वळत होता. दुर्दैवाने आम्ही सामना हरलो. मी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कारण पहिल्या हाफमध्ये खेळपट्टी संथ असेल असं मला वाटलं होतं. मदुशकाने उत्तम गोलंदाजी केली. आम्ही विराट आणि शुभमनने दिलेल्या संधी सोडल्या. अशा गोष्टींमुळे अनेकदा खेळ पालटतो. आमच्या गोलंदाजांनी मधल्या ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी केली. त्यांनी पहिल्या 6 ओव्हर्स फारच छान टाकल्या. मला वाटतं की आजचा दिवस हा गोलंदाजांचा होता. आमचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. मला अपेक्षा आहे की आम्ही या सामन्यांमध्ये दमदार पुनरागमन करु," असं म्हटलं.
भारतीय सलामीवीर शुभमन गिलने 92 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराट कोहलीचं 49 वं शतक केवळ 12 धावांनी हुकलं. कोहलीने 94 बॉलमध्ये 88 धावा केल्या. त्याने 11 चौकार लगावला. विराट आणि शुभमनने 189 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. रविंद्र जडेजानेही 24 बॉलमध्ये 35 धावा करत डावाच्या शेवटी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. नंतर भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाने 55 धावांवर श्रीलंकन संघाला बाद केलं अन् या विजयासहीत सेमीफायनल्समधील आपलं स्थान निश्चित केलं.