World Cup 2023 Suryakumar Yadav Instagram Story: वर्ल्डकपआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधून आपली तयारी पूर्ण झाली असल्याचं अधोरेखित केलं आहे. भारतीय संघ वर्ल्डकपआधी नियोजित पहिला सराव सामना खेळण्यासाठी गुरुवारी रात्री गुवहाटीमध्ये दाखल झाला. भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. या मालिकेमध्ये भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेल्या सूर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेपूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना चाचपडत असलेला सूर्या उत्तम फलंदाजी करताना दिसतला. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्ये सूर्याकडून अधिक उत्तम कामगिरी होईल अशी आशा चाहत्यांना आहे. दुसरीकडे याच मालिकेमध्ये श्रेयस अय्यरनेही दमदार कामगिरी करत वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपला दावा अधिक मजबूत केला आहे. दुखापतीमधून सावरलेल्या श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकावलं. आता या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचं हा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा समोर असणार आहे.
नक्की वाचा >> 'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी केवळ टी-20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याची बॅट क्रिकेटमधील या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये चांगलीच तपळपल्याचं दिसलं. मात्र हाच फॉर्म त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्येही कायम ठेवला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. त्याने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. दुसरीकडे श्रेयस अय्यरनेही तितकीच भन्नाट फलंदाजी करत दमदार शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांना लय गवसल्याने अंतीम 11 खेळाडूंमध्ये नेमकी कोणाला संधी द्यावी असा प्रश्न कर्णधार रोहितबरोबरच संघ व्यवस्थापनाला पडला आहे. बरं हा गोंधळ असल्याचं सूर्यकुमार यादवच्या इन्स्टा स्टोरीवरुनच स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा >> World Cup सामन्यांवर दहशतवादी हल्ला करण्याची खलिस्तान्यांची धमकी! पन्नू म्हणाला, 'मोदींनी...'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर श्रेयस अय्यरनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो स्टोरीजमध्ये शेअर केले होते. यापैकी एका फोटोत तो सूर्यकुमार यादवबरोबर दिसत होता. सूर्यानेही स्वत:चा आणि श्रेयस अय्यरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवला होता. त्याने या फोटोला 'वेटिंग' म्हणजेच वाट पाहतोय अशी कॅप्शन दिली आहे. यावरुनच सूर्यकुमारही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही याबद्दल संभ्रमात दिसतोय. श्रेयसला स्थान मिळालं तर सूर्याला संघातून डच्चू दिला जाईल असं म्हटलं जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये विराट कोहली खेळत नसल्याने श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार या दोघांनाही संघात स्थान मिळालं होतं. मात्र आता असं होण्याची शक्यता कमी असल्याचं मानलं जातं कारण विराट तिसऱ्या क्रमाकांवर खेळणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.
नक्की वाचा >> वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. या सामन्यामध्ये सूर्यकुमारला चांगली कामगिरी करता आली नाही. तो 48 धावा करुन बाद झाला. आता हे दोघे वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. असं असतानाच दोघांपैकी नेमकी कोणाला संधी मिळणार हे रहस्यही अगदी संघाची घोषणा होईपर्यंत कायम राहणार आहे.