बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की

World Cup : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसं या स्पर्धेची रंगत आणखी वाढताना दिसत आहे. अशा या स्पर्धेमध्ये नुकताच एक उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं.   

सायली पाटील | Updated: Oct 28, 2023, 08:58 AM IST
बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की title=
World Cup Mistake by Babar Azam and Defeat to Pakistan by that decision of the captain

PAK vs SA : भारत यजमानी करत असणाऱ्या वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) स्पर्धेतील 26 वा सामना नुकताच खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका असे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. चेन्नईतील एम ए चिदंबरम क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोठी धावसंख्या मात्र संघ उभा करू शकला नाही. 

पाकिस्तानच्या संघानं निर्धारित षटकांणध्ये 270 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढं उभं केलं. हे लक्ष्य गाठत असताना द. आफ्रिकेच्या संघानं 47.2 षटकांमध्ये 1 गडी राखून अतिषय रोमहर्षक विजय मिळवला. 

पाकिस्तानची फलंदाजी नाराज करणारी 

पाकिस्तानच्या संघातून फलंदाजांनी फारशी प्रभावी कामगिरी केली नसल्यामुळं सुरुवातीपासूनच हा तोल डगमगताना दिसला. अवघ्या 46.4 षटकांमध्ये संघाचा डाव गुंडाळला. संघातील सलामीवीर अब्दुल्लाह शफीकनं अवघ्या 9 धावा केल्या. तर, इमाम उल हक नं 12, मोहम्मद रिजवान 31 दावा करून तंबूत परतला, इफ़्तिख़ार अहमदनं संघात 21 धावांची भर घातली. संघासाठी मोहम्मद नवाज़नं 24 धावा केल्या तर, शाहीन आफ्रीदी 2 आणि मोहम्मद वसिम 7 धावांवरच परतले. इथं पाकच्या खेळाडूंपुढं दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तरबेज शम्सी यानं 4 गडी बाद केले. तर, मार्को यानसेन आणि जेराल्ड कट्जीनं अनुक्रमे तीन आणि दोन गडी बाद केले.  लुंगिसानी एनगिडीला एक गडी बाद करण्यात यश मिळालं. 

आफ्रिकेचं दमदार प्रदर्शन आणि बाबरची एक चूक 

पाकिस्ताननं दिलेली धावसंख्या गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात आला आणि या संघानं दमदार प्रदर्शन केलं. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये संघाकडून अफलातून खेळ दाखवत सामना खिशात टाकण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : दोन्ही हात नसतानाही उचललं 27 किलोचं धनुष्य; 16 वर्षीय शीतल देवीने जिंकलं सुवर्णपदक

 

राहिला प्रश्न पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या चुकीचा, तर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं अनेक चांगले निर्णय घेतले. दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामनाही इथं अपवाद ठरला नाही. पण, इथं त्यानं एक चूक केली आणि तीच चूक त्यालाही अडचणीत आणणारी ठरली. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बाबरनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. सर्व वेगवान गोलंदाजांची षटकं पूर्ण झाली होती. पण, उसामा मीरची षटकं शिल्लक होती. असं असतानाही बाबरनं मोहम्मद नवाजच्या हाती चेंडू दिला आणि त्यानं लेग स्टंपला हा चेंडू टाकला. अगदी सहजपणे या चेंडूची दिशा वळवत केशव महाराजनं तो चौकार मारला आणि बस्स, इथंच सामना पालटला, ज्यामुळं पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढवली.