WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय संघाला काही अंशी फळताना दिसलेला नाही. कारण, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. विरोधी संघातील. ट्रेविस हेडनं झळकावलेल्या शतकाच्या बळावर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात पहिल्या सत्रातील खेळात 327 धावांची नोंद करण्यात आली.
भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या फळीविषयी सांगावं तर, संघातील प्लेइंग 11 मध्ये आर. अश्विनचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळं हाच निर्णय संघाला शेकला असं क्रिकेट जगतातील दिग्गजांचं मत. अश्विनच्या तुलनेत उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर या दोघांनीही समाधानकारक कामगिरी केली नाही. ज्यामुळे (Ind Vs Aus) ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी याचा फायदा घेतला.
तिथं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारतीय संघाचा निर्णय कितपत योग्य होता हे अद्यापही ठरवता आलेलं नाही. पण, आपल्या संघानं नाणेफेक न जिंकतासुद्धा चांगल्या खेळाचं प्रदर्शन केल्याची बाब शतकवीर ट्रेविस हेड यानं बोलून दाखवली.
संघाच्या फलंदाजीबाबत सांगताना ट्रेविस म्हणाला, 'सध्या पीचवर बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्ही दुसऱ्या चेंडूनं खेळून पाहायला हवं होतं. दुसऱ्या दिवशी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, पण तरीही चांगली सुरुवात करणंही तितकंच महत्त्वाचं.'
ट्रेविस खेळपट्टीवर आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 गडी बाद 73 धावा इतकी होती. ज्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या बरोबरीनं त्यानं 251 धावांची भागिदारी करत दमदार आणि स्थिर खेळीचं प्रदर्शन केलं. आपल्या फलंदाजीविषयी सांगताना त्यानं स्थिर खेळीमध्ये संतुलन राखण्यात काही अडचणी आल्याची बाब नाकारली नाही.
सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असला तरीही या सामन्यात अश्विनला मात्र स्थान मिळालेलं नाही. संघाच्या बाबतीत घेण्यात आलेल्या या निर्णयानं क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनाही धक्का बसला. मागील WTC Final च्या वेळीसुद्धा भारतीय संघानं प्लेइंग 11 ची निवड करताना चूक केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आताही झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खेळपट्टीचा आणि अर्थातच भारतीय गोलंदाजांच्या कमकुवत आक्रमणाचा फायदा घेत प्रशंसनीय खेळाचं प्रदर्शन केलं.