नवी दिल्ली : भारताच्या अग्रगणी महिला अॅथलिट आणि इतर खेळाडूंचा गुरूवारी zee news fair play या पुरस्काराने गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या महिला खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी म्हणून चार वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. क्रीडा विश्वात देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा गौरव या पुरस्कार सोहळ्यादरम्यान करण्यात आला. यंदाच्या वर्षी बहुतांश महिला खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप या क्रीडाविश्वावर सोडली होती.
पुरस्कार विजेत्यांपैकीचं एक नाव म्हणजे बछेंद्री पाल. त्यांना झी समुहाकडून zee news fair play जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८४ मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त इतर पुरस्कारांसाठी अंजुम मोदगिल, हीना सिद्धू, राही सरनोबत या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
क्रीडा जगातात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या यादीत टेबल टेनिस खेळाडू मनेका बत्रा, वेटलिफ्टर शेखोम मीराबाई चानू आणि विनेश फोगाट यांच्याही नावाचा समावेश आहे. अतिशय दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रबंध संचालक अशोक व्यंकटरमणी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. काही खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्यांनी आपलं मनोगत मांडत आभार प्रदर्शनही केल्याचं पाहायला मिळालं.
खेळाडूंची कामगिरी, त्यांचं प्रदर्शन, जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व या अनेक गोष्टी एकत्र आणत आणि त्याची सुरेख सांगड घालत हा zee news fair play या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाची पुढची पिढीही क्रीडा क्षेत्रामध्ये अशीच पुढे जात रहावी. मुख्य म्हणजे नव्या पिढीने सर्वच क्षेत्रांमध्ये देशाचं नाव उज्वल करावं हाच अशा सोहळ्यांमागचा मुख्य हेतू आहे, असं म्हणायला हरकत नाही.