मुंबई : वोडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांचं मर्जर झालं आहे. या मर्जरवर रिलायन्स जिओनं ट्विटरवरून चिमटा काढला आहे. वोडाफोन-आयडियाच्या मिलनाला जिओनं शुभेच्छाही दिल्या आहेत. 'Hey, @VodafoneIN तुम्हाला माहिती आहे का सगळे आपल्याबद्दल बोलत आहेत, असं ट्विट आयडियाच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं. यावर वोडाफोननंही रिप्लाय दिला. हो @Idea. आता वेळ आली आहे आपण याची घोषणा करावी.
वोडाफोनच्या या ट्विटला जिओच्या ट्विटर हॅण्डलवरून रिट्विट करण्यात आलं. तसंच आम्ही २०१६ पासून लोकांना एकत्र आणतोय... वोडाफोन-आयडिया तुम्हाला जिओकडून खूप सारं प्रेम.... असं ट्विट जिओनं केलं.
Bringing people together since 2016. @VodafoneIN @Idea #WithLoveFromJio https://t.co/A7iDw6awvK
— Reliance Jio (@reliancejio) August 31, 2018
जिओकडून मिळणाऱ्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी वोडाफोन आणि आयडियाचं मर्जर झालं. काही कालावधीपूर्वी या कंपनी एकमेकांच्या तगड्या प्रतीस्पर्धक होत्या. या मर्जरनंतर वोडाफोन-आयडिया भारताची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. या कंपनीच्या ग्राहकांची संख्या ४१ कोटीच्या आसपास आहे.
नव्या कंपनीच्या बोर्डावर ६ स्वतंत्र डायरेक्टर असतील. कुमार मंगलम बिर्ला या बोर्डाचे अध्यक्ष असतील. बोर्डानं बालेश शर्मा यांना सीईओ म्हणून नियुक्त केलं आहे.