Nagpur News in Marathi: मुलाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर वडिलांनीही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर वडिलांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. धरमपेठ येथे ही दुर्देवी घटना घडली असून संपूर्ण शहरामध्ये यासंदर्भात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी घरातून बाप-लेकाची अंतयात्रा निघाल्याचं हृदयद्रवक घटनेमुळे स्थानिकांचेही डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं.
धक्का त्यांना सहन झाला नाही
ब्रेन हॅमरेजमुळे मोहित मोहन चंदेले या 41 वर्षीय व्यक्तीचं निधन झालं. मुलाच्या निधनाची बातमी समजताच 75 वर्षीय मोहन शंकरलाला चंदेले यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन हे टेलिफोन विभागातून निवृत्त झाले होते. त्यांना पूर्वीपासूनच ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यांच्या हृदयावर दोनवेळा शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. अशातच घरातील करता मुलगा गेल्याचं समजल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही.
ब्रेन हॅमरेजचा झटका
मोहन यांचा मुलगा मोहितकडे एका आईसक्रीम कंपनीची डिलरशिप होती. त्यांचे लग्न झाले होते. काही काळापूर्वी मोहितच्या मेंदूमध्ये रक्तात गुठळ्या तयार झाल्याचं निदान झालं होतं. त्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना अचानक मोहितला ब्रेन हॅमरेजचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहितच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांचे वडील मोहन यांनासुद्धा हृदयविकाराचा झटका आला.
अर्ध्या तासात दोघांचा मृत्यू
मुलाचा मृत्यू झाल्याचं मोहन यांना मोहितच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासाने सांगण्यात आलं. मात्र मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकतायच मोहन यांच्या छातीत कळ आली आणि त्यांचा श्वास थांबला. मुलाच्या निधनानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हा प्रकार घडला. अर्ध्या तासाच्या अंतराने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला मोहितचे चुलत बंधू जितेंद्र चंदेले यांनी दुजोरा दिला आहे. बाप-लेकाच्या या अकस्मात मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घरातील दोन्ही पुरुषांचं अशाप्रकारे अचानक निधन झाल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
एकाच वेळी दोघांच्या अंत्ययात्रा
चंदेले यांच्या घरातून एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृष्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले. पार्थिव अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत नेण्यासाठी उचलल्यानंतर घरातील महिलांनी एकच हंबरडा फोडल्याने अनेकांच्या अंगावर शहारा आला. मंगळवारी या बाप-लेकांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.