कोल्हापूर: शिवसेनेकडून शेलक्या भाषेत करण्यात आलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्याबद्दल अशी भाषा वापरली. मला हे अपेक्षितदेखील होते. मला राजकारणात किंमत नसेल तर माझी टीका शिवसेनेला इतकी झोंबलीच कशाला, असा सवालही यावेळी अजित पवारांनी विचारला.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवार यांनी या घोषणेची खिल्ली उडविली होती. उद्धव ठाकरेंना स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही. ते अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार, अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून अजित पवार यांच्या अब्रुची अक्षरश: लक्तरे काढण्यात आली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले की, मी उद्धव ठाकरेंबाबत काय चुकीचं बोललो? शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही. मात्र, कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, एवढे लक्षात ठेवा, असे पवार यांनी म्हटले.
तसेच शिवसेनेने केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचाही त्यांनी प्रतिवाद केला. सिंचन प्रकरणाची चौकशी ही न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.