सातारा: साताऱ्यातील मंगळवार तळ्यात गणपती विसर्जन करण्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले आहेत. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक जनतेला मंगळवार तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, उदयनराजेंची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला.
उदयनराजे भोसले यांनीच २०१५ मध्ये या तळ्यात गणेश मुर्तींचे विसर्जन करू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, आता त्यांच्या भूमिकेत अचानक बदल कसा काय झाला, असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पालिकेने आता या तळ्याशेजारी कृत्रिम तळे उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उदयनराजेंनी हे तळे आपली खासगी मालमत्ता असल्याचे सांगत आपण येथेच विसर्जन करणार, असे सांगत प्रशासनाला आव्हान दिले आहे.