पुणे: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला भाजप खासदार गिरीश बापट यांनी विरोध केला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता एकतर्फी लॉकडाऊनचा निर्णय घेतला, असा आरोप बापट यांनी केला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध, अनलॉकची केली मागणी
पुण्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेताना अजित पवारांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, असे बापट म्हणतात. मात्र, हा प्रश्न विचारणारे गिरीश बापट इतके दिवस कुठे होते? त्यांनी केंद्राकडून शहरासाठी किती निधी आणला, याचे उत्तर द्यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतर्फी लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा गिरीश बापट यांना हाच प्रश्न त्यांना विचारावासा वाटला नाही का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला. तसेच टीकेच्या निमित्ताने का होईना पुणेकरांना आपल्या खासदाराचे दर्शन झाले, असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी बापटांना लगावला.
लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार
पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात येतील. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पास दाखवून घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. या निर्णयाला पुण्यातील व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. मात्र, लोक नियम पाळत नसतील, तर लॉकडाऊनसारखे निर्णय घेणे भाग असते, असे वक्तव्य शुक्रवारी अजित पवार यांनी केले होते.