Criminal To Physically Castrated: अमेरिकेमध्ये अरब देशांमध्ये दिली जाते तशी अमानवीय शिक्षा देण्याचा निर्णय एका प्रकरणात गेण्यात आला आहे. 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला गरोदर केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ग्लेन सुलिव्हन सीनिअर असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. लुसियानामध्ये राहणाऱ्या 54 वर्षीय ग्लेनने 17 एप्रिल रोजी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याच्याविरुद्ध सेकेण्ड डिग्री रेपचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याल न्यायमूर्ती विलिम्य डिक्स यांनी 50 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे.
लिव्हिंग स्टोर पॅरिश शेरिफ ऑफिसने जुलै 2022 मध्ये या प्रकरणात तपास सुरु केला होता. पीडित चिमुकलीने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये ही मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं. डीएनए चाचणीनंतर ग्लेन हाच या मुलीच्या पोटातील बाळाचा बाप असल्याचं सिद्ध झालं.
2008 साली लुसियाना राज्यातील कायद्यानुसार एखाद्या पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर त्याचं लिंग छाटण्याची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली होती. लिंग छाटण्याची ही शिक्षा प्रत्यक्षात म्हणजेच फिजिकली किंवा रासायनिक इंजेक्शन देऊन म्हणजेच केमिकली अंमलात आणली जाऊ शकते अशी तरतूद आहे. प्रत्यक्षात लिंग छाटण्याच्या शिक्षेमध्ये शस्त्रक्रीयेच्या माध्यमातून अंडकोष काढली जातात. मात्र आरोपीची संमती असेल तरच ही शिक्षा सुनावता येते अशी कायद्यात तरतूद आहे. या अशा शिक्षेला ग्लेनने होकार दर्शवला आहे. मात्र शिक्षा पूर्ण होण्याच्या एक आठवडा आधीच अशाप्रकारे लिंग छाटण्याची प्रक्रिया केली जाते. म्हणजेच 54 वर्षीय ग्लेन त्याची 50 वर्षांची शिक्षा पूर्ण करुन 104 वर्षांचा होईल तेव्हा त्याच्यावर ही शस्त्रक्रीया केली जाईल. रासायनिक इंजेक्शन देऊन लिंग छाटण्याच्या शिक्षेमध्ये आरोपीला मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन अॅसिटेट नावच्या रसायनाचं इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. तसेच शरीरामधील टेस्टेस्टेरॉन तयार होण्याचं प्रमाण मंदावतं.
या मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर ग्लेनने दबाव निर्माण करुन वारंवार तिचं लैंगिक शोषण केल्याचं कोर्टासमोरील युक्तीवादामध्ये पोलिसांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं. सर्व पुराव्यांमुळे हा आरोप सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा सुनावण्यात आली. या मुलीने बाळाला जन्म दिला असून तिने त्याचं एकल पालकत्व स्वीकारलं असून त्यासंदर्भात कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे.
अमेरिकेमधील प्रत्येक राज्याचं स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय असतं. अमेरिकेत एकूण 50 राज्यं आहेत. या राज्यांना त्यांची त्यांची स्वतंत्र राज्यघटना आहे. त्यामुळेच ही राज्य त्यांच्या प्रांतामध्ये विशेष कायदा लागू करु शकतात. अशाच विशेष कायद्याअंतर्गत बलात्कार किंवा लैंगिक छळाच्या दुर्मिळ प्रकरणांमद्ये लुसियाना राज्यातील राज्यघटनेमध्ये लिंग छाटण्याच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसारच ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.