Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार

Viral News: बालीमध्ये (Bali) डोंगर, झाडं आणि इतर नैसर्गिक गोष्टींना पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात ही ठिकाणं देवाचं घर आहे अशी भावना आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 19, 2023, 08:37 PM IST
Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार title=

Viral News: बाली येथे पवित्र झाडासमोर न्यूड फोटोशूट करणाऱ्या रशियाच्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सला देशातून हाकलण्यात आलं आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, 40 वर्षीय महिलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फोटो शेअर केल्यानंतर बालीमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Luiza Kosykh अशी तिची ओळख पटली आहे. फोटोंमध्ये लुईझा Tabanan मंदिरात असणाऱ्या कायू पुतिथ (Kayu Putih​) झाडाजवळ नग्न अवस्थेत दिसत आहे. 

बालीमधील उद्योजक Ni Luh Djelantik यांनी इन्स्टाग्रामला या फोटोशूटमधील फोटो शेअर करत कडक शब्दांत सुनावलं आहे. "आमच्या मातृभूमीचा अपमान करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांनो बाली हे आमचं घर आहे, तुमचं नाही. तुम्हाला काय वाटतं आमच्या पवित्र झाडांभोवती न्यूड फोटो काढून तुम्ही फार कूल दिसत आहात. जर आमच्या परंपरा आणि संस्कृतीचा आदर करु शकत नसाल तर आपल्या देशात परत जावा," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ni Luh Putu Ary Pertami Djelantik (@niluhdjelantik)

दरम्यान लुईझा हिने हे फोटो आत्ताचे नसून, काही वर्षांपूर्वी काढण्यात आले होते असा दावा केला आहे. तसंच हे झाडं पवित्र आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. 

इंडोनेशियामधील प्रशासनाने 12 एप्रिलला लुईझाला अटक केली. तीन दिवसांनी रविवारी रात्री तिने देश सोडला आणि मॉस्कोला निघून गेली अशी माहिती कायदेशीर आणि मानवाधिकार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

रशियामधील या महिलेचा आपण मालमत्ता गुंतवणूकदार असल्याचा दावा आहे. जानेवारीमध्ये तात्पुरता मुक्काम असल्याचा व्हिसा वापरून तिने बालीमध्ये प्रवेश केला होता. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हा व्हिसा वैध होता. "सर्व पर्यटकांना बालीत कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या नाही याची कल्पना नाही. त्यामुळे आम्ही सर्व स्थानिकांना पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी बारीक लक्ष ठेवावं अशी विनंती करत आहोत," असं कायदेशीर आणि मानवाधिकार समितीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

दरम्यान एखाद्या परदेशी महिलेने 700 वर्षं जुन्या या पवित्र झाडासमोर अशाप्रकारे न्यूड फोटोशूट करण्याची ही दुसरी वेळ आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. गतवर्षी योगा इन्फ्लुएन्सर अॅलिना हिने झाडासमोर न्यूड फोटो शूट केले होते. यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची नोंद घेण्यात आली होती. यानंतर अॅलिनाने फोटो डिलीट करत माफी मागितली होती. 

अॅलिना आणि तिच्या पतीवर बेटावरून हद्दपार करण्यात आले होते. तसंच बालीमध्ये किमान सहा महिन्यांसाठी पुन्हा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसंच हद्दपार होण्याआधी जोडप्याला स्थानिक श्रद्धेनुसार पवित्र परिसरात शुद्धीकरण समारंभात भाग घ्यावा लागला.