Crime News : आफ्रिकन देश केनियामधून (Kenya) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केनियातील एका ख्रिश्चन धर्मगुरुच्या (priest) मालकीच्या जमिनीत आतापर्यंत 47 मृतदेह सापडले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या ख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीवर जेव्हा खोदकाम करण्यात आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आपल्या अनुयायांना आमरण उपोषण करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी या ख्रिश्चन धर्मगुरुला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केनियाच्या शाकाहोला जंगलात असलेल्या या चर्चमध्ये पोलिसांना अजून मृतदेह सापडले आहेत.
केनियाच्या पूर्वेकडील मालिंडी येथील पोलीस अधिकारी चार्ल्स कामाऊ यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे. आम्हाला आज 26 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आता एकून 47 मृतदेह हाती लागले आहेत. आम्ही मृतदेहासोबत ख्रिश्चन धर्मगुरुच्या आणखी अनुयायांचा शोध घेत आहोत, असे चार्ल्स कामाऊ यांनी म्हटले आहे. मागच्या आठवड्यात धर्मगुरुच्या मालकीच्या जमिनीमध्ये पहिला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर शोध घेतला असता आणखी मृतदेह हाती लागले आहेत.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी शाकाहोला जंगलाचा 800 एकर परिसरात सील केला असून तपास सुरु केला आहे. मंगळवारी गृहमंत्री तिथे भेट देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धर्मगुरु मॅकेन्झी नाथेंग यांना अटक केली आहे. आपल्या अनुयायांना आमरण उपोषण करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी या पास्टरला अटक करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी मॅकेन्झी नाथेंगला अटक केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मालिंदी येथील पास्टरच्या जमिनीवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांना तिथे 15 जण खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यातील चौघांचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कशामुळे झाला मृत्यू?
तुम्हाला येशूला भेटायचे असेल तर उपाशी रहावे लागेल असे मॅकेन्झी नाथेंगने आपल्या अनुयायांना सांगितले होते. दोन मुलांचा भूकेमुळे मृत्यू झाल्यानंतर नाथेंग स्वतः पोलिसांच्या समोर हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी नाथेंगवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर 700 डॉलरच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. तर नाथेंगच्या सहा अनुयायांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस आता सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत. जेणेकरून हे लोक उपाशीपोटी मरण पावले हे सिद्ध करता येईल.