New Zealand Earthquake: तुर्कीमध्ये (Turkey Earthquake) आलेल्या भीषण भूकंपांच्या आठवणी ताज्या असतानाच जगभरातील विविध राज्यांमध्ये भीषण भूकंपांची नोंद करण्यात आली. त्यातच आता आणखी एका देशाला भूकंपाचा जबर हादरा बसला आहे. हा देश म्हणजे न्यूझीलंड. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी होती. भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी सकाळसी 6 वाजून 11 मिनिटांनी हे भूकंपाचे हादरे जाणवले.
न्यूझीलंडमधील केर्माडेक बेट समुहामध्ये हा भूकंप आला. NCS च्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किमी खोलवर होता. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता जास्त असली तरीही त्सुनामीचा इशारा मात्र देण्यात आलेला नाही. परिणामी सध्या न्यूझीलंडला त्सुनामी किंवा तत्सम संकटाचा धोका नाही, असं संबंधित यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
Earthquake of Magnitude:7.2, Occurred on 24-04-2023, 06:11:52 IST, Lat: -29.95 & Long: -178.02, Depth: 10 Km ,Location: Kermadec Islands, New Zealand for more information Download the BhooKamp App https://t.co/QrBjJKkycR @ndmaindia @Indiametdept @Dr_Mishra1966 @DDNewslive pic.twitter.com/UlboEhMhEf
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 24, 2023
USGS च्या माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये आलेल्या या भूकंपानंतर साधारण 20 मिनिटांमध्ये म्हणजेच 6 वाजून 53 व्या मिनिटाला याच बेट समुहावर दुसऱ्यांदा भूकंपाचा हादरा जाणवला. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती. भूगर्भात साधारण 39 किमी खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं.
गेल्या काही महिन्यांपासून जगातील अनेक देशांमध्ये भूकंपामुळं दहशत पाहायला मिळाली. भारतातही परिस्थिती वेगळी नाही. देशातील दिल्ली आणि नजीकच्या परिसरात बऱ्याचदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. दरम्यान, सोमवारी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास मेघालयातील पश्चिम खासी पर्वतरांगांमध्ये 3.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती आहे. पण, हा भूकंप येतो तरी का? विचार केला आहे का कधी?
पृथ्वीच्या गर्भात असणाऱ्या टेक्टोनिक प्लेट्स सातत्यानं फिरत असतात. या प्लेट जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा धरणीकंप जाणवू लागतो आणि यामुळं भूकंप येतो. भूकंपाची तीव्रता 1 ते 9 रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते.