कोकणात डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची धावाधाव, समोर कोणती आव्हान?

Uddhav Thackeray: कोकणासाठी ठाकरेंची धावाधाव सुरु आहे. कोकणात शिवसेना UBTचा एकही खासदार नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 16, 2025, 09:47 PM IST
कोकणात डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची धावाधाव, समोर कोणती आव्हान? title=
कोकणात ठाकरेंच्या पक्षाला गळती

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागल्याचं दिसून येतयं. कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्ष आता खडबडून जागा झालाय. कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या गळतीमुळे उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलसाठी बैठकांचा सिलसिला सुरु करण्यात आलाय.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या चिंतेच वातावरण निर्माण झालंय. कारण कोकणात राजन साळवी यांच्यापाठोपाठ गणपत कदम, सुभाष बने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेंचं शिवधनुष्य हातात घेतलंय. त्यातच भास्कर जाधव यांनी सुद्धा खंत व्यक्त केलीये. त्यामुळे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आलेत. सेनाभवनात दोन दिवसांपासून महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत सुरु असताना आज राजापूरमधील पदाधिका-यांची सुद्धा बैठक घेण्यात आलीये.

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला उतरती कळा का लागलीये. सध्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कमी झाल्याचं दिसून येतंय.

कोकणासाठी ठाकरेंची धावाधाव सुरु आहे. कोकणात शिवसेना UBTचा एकही खासदार नाही. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात विनायक राऊतांचा पराभव विधानसभा निवडणुकीत कोकणातील 15 पैकी एका जागेवर विजय मिळवला. गुहागरमधून एकमेव भास्कर जाधव विजयी झाले. भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. कोकणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे 9 आमदार होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कोकणात केलेली कामगिरी आणि महायुतीला मिळालेले यश पाहता उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक आव्हान निर्माण झालीयेत.

कोकणात ठाकरेंसमोर कोणती आव्हानं? 

सोबत असलेल्या पदाधिका-यांना थांबवणे, कार्यकर्त्यांसाठी विविध कार्यक्रम देणे, झेडपी, पालिका निवडणुकीसाठी मोट बांधणे, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर थांबवणे ही ठाकरेंसमोर आव्हानं आहेत. कोकणातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची सुरु असलेली धावाधाव पाहता महत्त्वाच्या पदाधिका-यांच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संवाद साधल्यास कार्यकर्त्यांचं मनोध्येर्य वाढण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सुरु असलेल्या संघटनात्मक बैठकांमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोकणात पुन्हा उभारी घेण्यास सक्षम ठरेल का हे पाहावं लागेल.