हेमंत चापुडे (प्रतिनिधी) जुन्नर : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलंय. असं असताना आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतलीये. सुरेश धसांनंतर संदीप क्षीरसागर यांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का, अशी चर्चा सुरु झालीये.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवणा-यांमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आघाडीवर होते. संदीप क्षीरसागर यांनीच पहिल्यांदा वाल्मिक कराडचा देशमुख हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता. पण आता त्यांच्याही विरोधाची धार कमी होत चालल्याचं दिसू लागलंय.संदीप क्षीरसागरांनी धनंजय मुंडे ज्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांची भेट घेतली. जुन्नरच्या बाजार समितीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागरांची भेट झाली. भेटीपर्यंत ठीक आहे.त्यांनी अजित पवारांचे आशीर्वादही घेतले. ही भेट म्हणजे तहाची नांदी आहे का अशी चर्चा या निमित्तानं सुरु झालीये. आपण पाणीप्रश्नावर अजितदादांची भेट घेतल्याचा दावा संदीप क्षीरसागरांनी केलाय.
हेही वाचा : महाराष्ट्रातील चिकनप्रेमींसाठी चिंताजनक बातमी, GBSचा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
संदीप क्षीरसागर पाणीप्रश्नावर भेटल्याचा दावा करत असले तरी त्यांची देहबोली खूप काही सांगत होती. बीडचा पालकमंत्री असल्यानं बीड शहरात 21 दिवसांनी येणा-या पाण्याच्या प्रश्नावर क्षीरसागर भेटल्याचं सांगत माध्यमांवरच डाफरण्यास सुरुवात केली.
बीड शहरातल्या पाणी प्रश्नावर संदीप क्षीरसागर भेटल्याचा अजितदादांचा दावा तितकासा पटण्यासारखा नाही. अवघ्या आठवडा दोन आठवडाभरापूर्वीच अजितदादांच्या नेतृत्वात बीडच्या डीपीडीसीची बैठक झाली. त्या बैठकीतही अजितदादांसमोर बीडचा पाणीप्रश्न संदीप क्षीरसागरांनी मांडलाच असेल. मग आता एवढी तातडीची गरज काय की अजितदादांची जुन्नरला जाऊन क्षीरसागरांनी भेट घेतली. सुरेश धस शांत झाल्यानंतर संदीप क्षीरसागरांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का अशी चर्चा आता बीड जिल्ह्यात सुरु झालीये.