Akola Urdu School: अकोला जिल्ह्यातील पातुर येथील एका उर्दू शाळेच्या संचालकांवर राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी कारवाई केली होती. यानंतर आता अकोला जिल्ह्यातील उर्दू शाळेत होत असलेल्या गैरव्यवहार प्रकरणाला वाचा फुटत आहेय.
शिक्षकांना मानसिक देण्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि बॉईज उर्दू स्कूलच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिला. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी या शाळेच्या शिक्षक आणि संचालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलीय.
या बैठकीदरम्यान महिला शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले.महिला शिक्षकांशी सातत्याने दुर्व्यवहार केला जातो, तसेच नियुक्तीसाठी शारीरिक छळ आणि लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सेवा देत असतानाही, संचालक आपल्या जवळच्या नातेवाईकांची नियुक्ती करत आहेत, असे शिक्षकांनी सांगितले.
महिला शिक्षकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकल्यानंतर प्यारे खान यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले आणि पाच दिवसांत शिक्षकांना न्याय देण्याचे आदेश दिलेय.त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर या कालावधीत उपाययोजना केल्या नाहीत, तर संबंधित संचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.विशेष म्हणजे, ११ फेब्रुवारी रोजी प्यारे जिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे असलेल्या अल्हाज सलीम झकेरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेची पाहणी केली होती.
यावेळी शाळेतील अनेक अनियमितता आणि गैरव्यवहार समोर आले होते. या कारवाईनंतर अल्पसंख्यांक उर्दू शाळांचे संचालक धास्तावले आहेत, तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महिला शिक्षकांवर होणारा अत्याचार संदर्भातही यावेळी शिक्षकांनी आपली व्यथा मांडली.
अल्पसंख्यांक आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे उर्दू शाळांमध्ये व्यवस्थापन सुधारणा होईल आणि शिक्षकांना त्यांचे हक्क मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.