Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध धमाकेदार विजय मिळवला होता, आयसीसी टूर्नामेंटपूर्वी इंग्लंडला 3-0 ने पराभूत करण्यात टीम इंडियाला यश आले होते. या वनडे सीरिजमध्ये श्रेयस अय्यरने फलंदाजीत उत्तम कामगिरी करून 181 धावा केल्या आणि या परफॉर्मन्समुळेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात संधी मिळाली. परंतू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निश्चित करताना सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड करताना श्रेयस अय्यरच्या नावावर आगरकर आणि गंभीर यांचं एकमत होत नव्हतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम सिलेक्शन मीटिंगमध्ये आगरकर आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. फक्त श्रेयस अय्यर नाही तर दोघांमध्ये वाद हा विकेटकिपिंग पोझिशनवरून देखील झाला होता. सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना वाटत होते की विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पहिलं प्राधान्य द्यावं. यावर गौतम गंभीरने सांगितले की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकिपर म्हणून केएल राहुल ला प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि यावर टीम मॅनेजमेंट कायम असेल. त्यानुसार इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये ऋषभ पंतला सर्व सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले आणि केएल राहुलला तिनही सामन्यात संधी मिळाली.
हेही वाचा : रोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral
भारताचे सर्व सामने हे दुबई स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी टीम इंडिया मुंबईहून दुबईला पोहोचली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून या संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी पहिला सामना बांगलादेश सोबत खेळेल. तर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना हा 23 फेब्रुवारी रोजी होईल. तर भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाईल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.
नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे