मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्या खेळाडूची एंट्री, 330 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्थान

IPL 2025 : आगामी आयपीएलला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्समध्ये एका खेळाडूची एंट्री झाली आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 16, 2025, 03:00 PM IST
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्या खेळाडूची एंट्री, 330 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्थान  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. आगामी आयपीएलला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) एका खेळाडूची एंट्री झाली आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज अल्लाह गझनफर हा दुखापतीच्या कारणामुळे आयपीएलमधून बाहेर पडलाय. त्यामुळे त्याच्या बदल्यात अफगाणिस्तानचाच युवा स्टार गोलंदाज मुजीब उर रहमान याला संधी देण्यात आलीये. 

कोण आहे मुजीब उर रहमान? 

23 वर्षीय मुजीब उर रहमान हा अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर गोलंदाज असून त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये 19 सामने खेळले आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने 2018 मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला होता. मुजीब हा अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक होता आणि वयाच्या 17 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करून त्याने आपल्या फिरकीने सामन्यावर प्रभाव पाडला. मुजीब उर रहमान याने आतापर्यंत 300 हुन अधिक टी 20 सामने खेळले असून यात जवळपास 330 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 19 सामन्यात त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत. अल्लाह गझनफर हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यावर मुजीबला मुंबई इंडियन्सने साइन केले. 

हेही वाचा : रोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral

 

मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर कधी खेळणार पहिला सामना? 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मधील त्यांचा पहिला होम ग्राउंड सामना वानखेडे स्टेडियमवर 31 मार्च रोजी होणार आहे.  तसेच यापूर्वी मुंबई इंडियन्स स्पर्धेतील दोन सामने खेळेल. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 चा सीजन फार चांगला गेला नव्हता, स्पर्धेच्या अंती ते पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होते. यंदाही मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे असून यावर्षी संघ कसा परफॉर्म करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

कधी सुरु होणार आयपीएल? 

बीसीसीआयचे राजीव शुल्का यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आयपीएल 2025 मार्च 21 पासून सुरु होईल तर याचा अंतिम सामना हा 24 मे रोजी होणार असल्याचे सांगितले होते. परंतु आता क्रिकबझला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मार्च पासून आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे.