Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी दुबईला रवाना झाला आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई या ठिकाणांवर हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल. भारताचे सर्व सामने हे दुबई स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी टीम इंडिया मुंबईहून दुबईला पोहोचली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याचदा काही गोष्टी विसरतो. काल दुबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ समोर आला. यात तो कोणतीतरी गोष्ट विसरल्याने चिंतेत झालेला दिसला.
यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 संघ क्वालिफाय झाले असून याना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी पहिला सामना बांगलादेश सोबत खेळेल. तर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना हा 23 फेब्रुवारी रोजी होईल. तर भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाईल.
सध्या व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा दुबई एअरपोर्टवर उतरल्यावर चिंतेत दिसला. दुबई एअरपोर्टवर लँड झाल्यावर तो टीम सोबत बसमध्ये बसला. तेव्हा बसल्या बसल्या त्याला कोणतीतरी गोष्ट लक्षात आली आणि बसच्या दरवाज्याजवळ येऊन तो सपोर्ट स्टाफमधील एका व्यक्तीला आवाज दिला. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तो व्यक्ती रोहित जवळ आला यावेळी रोहितने त्याला काहीतरी सांगितले. तो सपोर्ट स्टाफ मधील सदस्यासोबत काहीतरी बोलताना दिसला. त्याच्या हावभाव आणि बोलण्यावरून असे वाटत होते की तो काहीतरी विसरलाय. हिटमॅनचं ऐकल्यानंतर सपोर्ट स्टाफ सदस्यही खूप घाबरलेला दिसला.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली
रोहितच्या गोष्टी विसरण्याचा स्वभावाबाबत अनेक टीम मेंबर्सनी देखील मुलाखतीत सांगितले आहे. विराटने एकदा सांगितले होते की रोहित शर्मा घड्याळ, लॅपटॉप, आयपॅड, साखरपुड्याची अंगठी, पासपोर्ट अशा अनेक गोष्टी विमानात तसेच हॉटेल रूमवर विसरून आलाय. एकदा तर न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळत असताना भारताने टॉस जिंकला आणि कर्णधार असलेला रोहित शर्मा टॉस जिंकून बॅटिंग निवडायची की बॉलिंग हेच विसरून गेला होता.