New Delhi Station Stampede: कुंभमेळ्यात अमृत स्नानाला जाण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वे स्थानकात जमले होते. स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. गर्दी इतकी वाढत गेली की एक दुर्घटना झाली आणि तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला तर डझनभर लोक गंभीर जखमी झाले. देशाची राजधानी दिल्लीतील रेल्वे स्थानक, हायटेक सुविधा असताना रेल्वे प्रशासन गर्दी नियंत्रणात आणण्याचा दावा पुन्हा एकदा सपशेल फेल झाला आहे. रेल्वे स्थानक पुन्हा एकदा अव्यवस्थेचा शिकार झाले असून नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात 15 फेब्रुवारी रोजी रात्री चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 18 प्रवाशांचा जीव गेला. मात्र ही घटना नेमकी कशी घडली आणि रेल्वे प्रशासनाला गर्दीचा अंदाज आला नव्हता का? तिकिटांची किती विक्री झाली होती? असे सवाल उपस्थित होत आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 13,14 आणि 15 वर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती. या प्लॅटफॉर्मवर प्रयागराजला जाणारी ट्रेन येणार होती. महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी हजारो लोक स्थानकात पोहोचले होते. त्यामुळं गर्दी वाढत होते आणि स्थिती नियंत्रणाबाहेर झाली. महाकुंभला जाण्यासाठी स्थानकात 4 वाजल्यापासून प्रवासी येत होते.
रेल्वेचे अतिरिक्त कमिश्नर ऑफ पोलीस (DCP) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत होते. प्लॅटफॉर्म नंबर 13,14 वर स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस येणार होती. यासाठीही प्रवासी गर्दी करत होते. मात्र ट्रेन लेट झाल्यामुळं तिथली गर्दी वाढत होती.
रिपोर्टनुसार रेल्वेकडून प्रत्येक तासाला जवळपास 1,500 जनरल तिकिटांची विक्री होत होती. ज्यामुळं स्थानकातील गर्दी अचानक अनियंत्रीत झाली.
एकीकडे लोक कुंभमेळ्यात जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होते. तर दुसरीकडे प्लॅटफॉर्मवरील गर्दी पाहून रेल्वेने प्लॅटफॉर्म नंबर 16 वरुन प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा केली. घोषणा ऐकताच प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभे असणारे जनरल तिकिटचे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 16कडे धावले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनसाठी प्रत्येक तासाला 1500 जनरल तिकिटांची विक्री करण्यात आली. अशातच जनरल बोगीच्या क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री का केली गेली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.