Aashiqui film: महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला 'आशिकी' हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. खरंतर, या चित्रपटापेक्षा त्यातील गाणीच प्रेक्षकांच्या अधिक पसंतीची ठरली. या रोमॅन्टीक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचाच परिणाम म्हणून, काही वर्षांनंतर 'आशिकी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळालं. सध्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच 'आशिकी 3' च्या चर्चा रंगत आहेत. यादम्यान, कार्तिन आर्यनच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला असून, तो 'आशिकी 3' मध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
'आशिकी 3' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसु हे करणार असून त्यांच्यासोबत कार्तिक आर्यनसुद्धा चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अॅनिमल या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी काम करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, तृप्ती या चित्रपटाच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडली आणि यामागचं कारण अद्याप प्रेक्षकांसमोर आलेलं नाही.
टी-सिरीजकडून कार्तिक आर्यनच्या येणाऱ्या चित्रपटाचा फर्स्ट लुक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या लुकमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटातील किसिक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री श्रीलीला कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक लांब केस आणि दाढी असलेल्या इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तो आपल्या हातात गिटार घेऊन 'आशिकी' या पहिल्या चित्रपटातील 'तू मेरी जिंदगी है' हे सुप्रसिद्ध गाणं गात आहे. या फर्स्ट लूकमध्ये कार्तिक आणि श्रीलीलाची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. कार्तिक आणि श्रीलीलाचा हा बहुचर्चित चित्रपट यंदाच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.
कार्तिक आर्यनचा याआधी प्रदर्शित झालेला चित्रपट 'भूल भुलैया 3' हादेखील दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 300 कोटींची गडगंज कमाई केली तसेच, हा कार्तिकच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. आता कार्तिकचा आगामी चित्रपटदेखील दिवाळीतच प्रदर्शित होणार असून हा चित्रपटसुद्धा तितकाच हिट ठरणार असल्याचे चाहत्यांकडून सांगितलं जात आहे.