Vitamin C: शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात आंबट फळे किंवा पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत असतात. त्यामुळे बरेचसे लोक आपल्या आहारात आंबट फळे आणि पदार्थांचा सल्ला दिला जातो. आंबट फळे किंवा पदार्थ हे व्हिटॅमिन C चे उत्तम स्त्रोत असतात. व्हिटॅमिन C (एस्कॉर्बिक अॅसिड) हे स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर मानले जाते. अनेकांच्या मते, प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असते. पण हे खरं आहे का? सविस्तर जाणून घेऊया.
खरंतर, प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन सी नसतं. बहुतांश लिंबूवर्गीय फळांमध्ये हे पोषक तत्व आढळून येत असल्याने बऱ्याचजणांना हाच समज असतो. मात्र, सर्वच आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन C असेलच असे नाही. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा आणि किवी यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. परंतु, दही, टोमॅटो, चिंच, ताक असे पदार्थ तसेच काही आंबट भाज्यांमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण फारच कमी असते.
शरीरात व्हिटॅमिन C चे प्रमाण वाढवायचे असल्यास आहारात लिंबू, संत्री, मोसंबी, तसेच ग्रेपफ्रूट (ईडलिंबू) या फळांचा समावेश करा. आवळा देखील व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पपई हे फळ गोड असूनही त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. स्ट्रॉबेरी तसेच किवी या फळांमध्ये देखील व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
काही आंबट पदार्थ त्यांच्या नैसर्गिक अॅसिडिक म्हणजेच आम्लयुक्त चवीमुळे आंबट लागतात. मात्र, त्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन C नसते. तसेच, चिंचदेखील ती चवीला खूप आंबट असते पण त्यात व्हिटॅमिन C खूप कमी असते. टोमॅटोसुद्धा जरी आंबट असला तरी त्यात व्हिटॅमिन C चे प्रमाण संत्री किंवा लिंबाच्या तुलनेत खूपच कमी असते. दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ नक्कीच आंबट असतात पण त्यात व्हिटॅमिन सी आढळत नाही. लोणचे आणि आंबवलेले पदार्थ चवीत आंबट असले तरी त्यात व्हिटॅमिन C नसते.
शरीराला व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि वारंवार आजारी पडण्याचा धोका वाढतो. यामुळे त्वचा आणि केसांवर विपरित परिणाम होतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)