साओ पाउलो : ब्राझीलच्या उत्तर प्रांतातील तुरुंगात सोमवारी दोन गटांत हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात ५७ कैद्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासनाने दिली. या प्रांताची राजधानी बेलेमपासून ८५० किमी अंतरावर असलेल्या अल्तामीरा येथील कारागृहात हिंसाचार सुमारे पाच तास सुरू होता. अखेर विविध सरकारी यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर यावर नियंत्रण ठेवण्यात यश आले.
मृतांपैकी १६ जणांचे धड शरीरापासून विभक्त करण्यात आले होते. एका गटाने आग लावल्याने या होरपळून ४१ जणांचा मृत्यू झाला. प्रांतीय कारागृहाचे प्रमुख जारबास वास्कोन्सेलॉस यांनी सांगितले की, “दुसर्या गटाला संपवून टाकण्यासाठी हा स्थानिक हल्ला करण्यात आला. त्यांनी (हल्लेखोर) कारागृहात प्रवेश केला आणि जबरदस्तीने आग लावली.
कारागृह व्यवस्थापनाने सांगितले, तुरूंगाच्या एका भागामध्ये कैदी न्याहरीसाठी बसले होते. त्यावेळी दुसर्या सेलमधून काही हल्लेखोर जबरदस्ती करत घुसले. त्यांनी देशी शस्त्राच्या सहायाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर अनेकांना ओलीस धरले. त्यानंतर दोन कर्मचार्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर अन्य दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
काही कैद्यांच्या नातेवाईकांनी वाद टाळण्यासाठी अल्तामीरामध्ये प्रदर्शन करत एका गटाला दुसरीकडे हलविण्याची मागणी केली. वॅस्कोन्सेलोस यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारच्या हिंसाचारापूर्वी प्रशासनाकडून काही संकेत दिले गेले नाहीत.