ब्युरो रिपोर्ट : संपूर्ण जगाला जखडून ठेवणाऱ्या आणि सुमारे १ लाख ७१ हजाराहून अधिक बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा विषाणू चीननेच प्रयोगशाळेत बनवला असा अमेरिकेसह अनेक देशांना संशय आहे. चीन याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडे बोट दाखवत आहे. तर ऑस्ट्रेलियासह काही देशांनी याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशीची मागणी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला तेव्हा आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यानं दिलेले स्पष्टीकरण चीनला दिलासा देणारे होते. ‘कोरोनाचा विषाणू गेल्या वर्षीच्या अखेरीस चीनमधील प्राण्यांमधून निर्माण झाला असून उपलब्ध पुरावे तेच सांगतात,’ असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या फेडेला चाइब यांनी स्पष्ट केलं. कोरोना व्हायरसचा विषाणू प्रयोगशाळेत तयार केलेला नाही, असं त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात याबाबत चीनवर आरोप केला होता. मध्य चीनच्या वुहान प्रांतामधील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आला आहे का? याचा आम्ही शोध घेत आहोत, असं ट्रम्प म्हणाले होते.
ट्रम्प यांच्या आरोपानंतर अन्य काही देशांनीही चीनकडे संशयाची सुई रोखली होती. चीनच्या प्रवक्त्याने थेट ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर न देता जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन याबाबत आधीच खुलासा झाला आहे, असं म्हटलं होतं. तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मेरिस पेने यांनीही कोरोना विषाणूच्या निर्मिती आणि प्रसारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली होती. चीनच्या प्रवक्त्याने ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्यांवर तीव्र नापसंती व्यक्त केली होती.
जिनिव्हामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्त्या फेडेला चाइब यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस प्राण्यांमधूनच निर्माण झाला असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. व्हायरस प्रयोगशाळेत तयार केलेला नाही. कोरोना व्हायरस प्राण्यांमधून निर्माण झाला आहे, हे जवळजवळ निश्चित आहे, असं त्या म्हणाल्या.
कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून नकळत बाहेर येणं शक्य आहे का? याबाबत अधिक स्पष्टीकरण करण्याच्या विनंतीला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
वुहान विषाणूशास्त्र संस्थेनं मात्र कोरोना विषाणू प्रयोगशाळेत बनवल्याची किंवा प्रयोगशाळेतून बाहेर सोडल्याची शक्यता फेटाळून लावली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा कोरोना व्हायरस साथीचा मुकाबला करण्याच्या मोहिमेवर किती परिणाम होईल असा प्रश्न विचारला असता WHO च्या प्रवक्त्या चाईब यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनंतर आम्ही अजून परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर मार्ग काढू. आम्ही केवळ कोविडबाबतच काम करत नाही, तर अन्य बरेच आरोग्यविषयक कार्यक्रम राबवत आहोत, जसे पोलिओ, एचआयव्ही आणि मलेरियासारख्या अन्य आजारांवरही आम्ही काम करत आहोत.
जिनिव्हा इथं मुख्यालय असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी अमेरिका सर्वात मोठा निधी पुरवठादार आहे. याशिवाय ब्रिटन आणि गेट्स फाउंडेशन हेदेखिल दोन मोठे देणगीदार आहेत.