बिजिंग : चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार कुणी केला आणि हा व्हायरस कुणी बनवला यावरून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या व्हायरसला वुहान व्हायरस म्हणून चीनला चिमटा काढला आहे. जगभरात अनेक देश लॉकडाऊन झाले आहेत. पण एका अभ्यासानंतर कोरोना व्हायरस म्हणजे कोविड19 चा उगम नेमका कुठून होत आहे, याचा शोध घेतला जात आहे
चीनच्या वुहानमधील एका मासविक्री करणाऱ्या मार्केटमधून हा व्हायरस आल्याचं म्हटलं जात होतं. कारण या मार्केटमधील अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती आणि हे समजायला खूप उशीर झाला होता.
धक्कादायक बाब म्हणजे खवले मांजर, इंग्रजीत ज्याला पँगोलियन म्हणतात या सस्तन प्राण्यात कोरोना व्हायरसशी साधर्म्य असणारा व्हायरस अभ्यास करणाऱ्यांना मिळाला आहे.
चीनमध्ये तस्करी करून हे खवले मांजर विक्रीसाठी आणलं जातं. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित एका शोध निबंधात म्हटलं आहे की, याचा जेनेटिक डेटा दाखवतो की, या प्राण्यांची विक्री करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
तसेच बाजारात विक्री करण्यावर बंदी आणली पाहिजे आणि विक्री करणाऱ्यांवर मोठ्या शिक्षेची तरतूद केली पाहिजे.
पँगोलियन हा एक मुंग्या खाणारा सस्तन प्राणी आहे. या प्राण्याचं मास खाण्यासाठी आणि पारंपरिक औषध निर्मितीसाठी वापरलं जातं. चीनमध्ये अनेकांना या प्राण्याचं मास रुचकर लागतं असंही म्हणतात.
याआधी वटवाघुळाकडून कोरोना व्हायरस इतर प्राण्यात जावून प्रसार झाला असेल असं म्हटलं जात होतं.
खवल्या मांजराची जगभरात तस्करी केली जाते, त्यामुळे या मांजराची जात जगातून नाहिशी होण्याच्या वाटेवर आली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार कुठून झाला आहे, याचा अभ्यास करणाऱ्यांनी म्हटलं आहे, चीन आणि दक्षिणपूर्व आशियाच्या जंगलात हे खवले मांजर दिसून येतं.
या मांजरावर विशेष नजर ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे भविष्यात मानवात या प्राण्याकडून होणारं संक्रमण थांबवण्यास मदत होईल. तसेच या प्राण्यापासून व्हायरसचा किती धोका आहे, आणि तो कसा आहे, हे स्पष्ट होण्यास मदत होईल.