वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण निकाल आता लागला आहे. शुक्रवारी तीन राज्यांचे निकाल जाहीर करण्यात आले, अॅरिझोना आणि जॉर्जियामध्ये जो बिडेन विजयी झाले आहेत, तर उत्तर कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले.
मतमोजणी संपल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांना एकूण 306 मते मिळाली तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना 232 मते मिळाली. याआधी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना 306 मतं मिळाली होती. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना 232 मते मिळाली होती.
जॉर्जियात 28 वर्षानंतर डेमोक्रॅट्सचा विजय
जॉर्जिया राज्यात, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराने 28 वर्षानंतर विजय मिळविला आहे. यापूर्वी बिल क्लिंटन यांनी 1992 मध्ये जॉर्जियामध्ये विजय मिळविला होता. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, जॉर्जियामध्ये जो बिडेन यांनी केवळ 14,000 मतांनी विजय मिळविला आहे.
20 जानेवारीला शपथ
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 306 मते मिळवल्यानंतर, जो बिडेन 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील आणि अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होतील. जो बिडेन अमेरिकच्या इतिहासातील सर्वाधिक वय असलेले पहिले व्यक्ती आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, 'जर माझी कायदेशीर मते मोजली तर मी सहज जिंकेल. मी यापूर्वीही बरीच महत्त्वाची राज्ये जिंकली आहेत. शक्तिशाली माध्यम, पैसा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर निवडणुकीत ऐतिहासिक हस्तक्षेप झाल्यानंतर ही आम्ही ऐतिहासिक मतांनी विजयी झालो.'