Kohinoor Cursed Diamond Dark Secret Connection With King Charles Cancer: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं 2022 मध्ये निधन झाल्यानंतर ब्रिटनच्या राजगादीवर आलेले किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींसंदर्भात तक्रार असून त्याच्या तपासणीदरम्यानच कर्करोगाचं निदान झालं, असं ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. किंग चार्ल्स यांना झालेल्या कर्करोगासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असं असतानाच आता त्यांच्या या आजारपणाचं कोहिनूर कनेक्शनही चर्चेत आहे.
कोहिनूर नेमका कुठे आणि कधी सापडला याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. त्यामुळेच या हिऱ्याचं गूढ आजही कायम आहे. मात्र सर्वाधिक मान्यता असलेला दावा म्हणजे गोवळकोंडा प्रांतातील कोल्लूर खाणींमध्ये हा हिरा सापडला. सध्या हे ठिकाण तेलंगणमध्ये आहे. या हिऱ्याचा आकार आणि त्याच्या सौंदर्यामुळे तो फारच मौल्यवान आहे. त्यामुळेच हा हिरा ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती शक्तीशाली असून तिच्याकडे भरपूर अधिकार आहेत असं समजलं जातं. म्हणूनच हा हिरा सापडल्यापासून तो सत्ता आणि राजघराण्याचं प्रतिक मानला जातो.
मागील अनेक दशकांमधील कोहिनूर हिऱ्याचा प्रवास पाहिल्यास तो वेगवेगळ्या राजांच्या, संस्थानिकांच्या ताब्यात होता. हा हिरा मुघल सरदार शाहजहाँच्या मुकुटामध्ये होता. त्यानंतर हा हिरा 1739 रोजी पर्शियन आक्रमक नादर शाहने ताब्यात घेतला. बराच प्रवास करत हा हिरा अखेर शिख संस्थानिक रणजीत सिंह यांच्याकडे आला. 1839 मध्ये रणजीत सिंह यांचं निधन झाल्यानंतर ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीने हा हिरा ताब्यात घेतला. हा हिरा बरेच राजकीय वाद आणि हेव्या दाव्यानंतर सध्या ब्रिटीशांच्या ताब्यात असला तरी या हिऱ्याशीसंबंधित एक दावा असाही केला जातो की याचा ताबा पुरुषांकडे असेल तर त्या पुरुषाला धोका निर्माण होतो.
जगातील सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा अशी कोहिनूरची ओळख आहे. अनेक शतकांपासून हा हिरा औत्सुक्याचा विषय ठरत आहे. सध्या हा हिरा ब्रिटनच्या राजघराण्याच्या मुकुटात लावण्यात आला आहे. हा हिरा अनेक राज्यकर्ते आणि सम्राटांकडून ब्रिटनपर्यंत पोहोचला आहे. या हिऱ्याचा इतिहास पाहिल्यास तो दक्षिण भारतातून सुरु होतो. मात्र आता किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर कोहिनूरसंदर्भात एक शाप खरा आहे की काय अशी शंका पुन्हा उपस्थित केली जात असल्याचं वृत्त 'इकनॉमिक टाइम्स'ने दिलं आहे. कोहिनूरसंदर्भातील अनेक दावे आणि दंतकथांपैकी एक असं सांगते की या हिऱ्याची मालकी पुरुषांकडे असेल तर त्या पुरुषावर संकट ओढावतं, असा शाप या हिऱ्याला आहे.
A statement from Buckingham Palace: https://t.co/zmYuaWBKw6
Samir Hussein pic.twitter.com/xypBLHHQJb
— The Royal Family (@RoyalFamily) February 5, 2024
ज्या राजाकडे किंवा संस्थानिकाकडे हा हिरा आला त्याची अधोगती सुरु झाली. खिलजी असो किंवा रणजीत सिंह असो सर्वांबरोबर हेच घडलं. हा हिरा ताब्यात आल्यानंतर काही काळातच त्या राजवटीमधील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोहिनूर घेऊन जाणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधातही हिरा ताब्यात घेतल्यानंतर 1857 मध्ये उठावाचा सामना करावा लागला.
ब्रिटीशांनी हाच अजब योगायोग लक्षात घेत हा हिरा केवळ राजघराण्यातील महिलेकडे राहील असा प्रयत्न केला. आधीची महाराणी व्हिक्टोरियापासून ते महाराणी एलिथाबेथ दुसऱ्या यांच्यापर्यंत अनेक महाराण्यांकडेच हा हिरा राहिला. अनेकदा हा हिरा भारताला परत करण्यासाठी भारतीयांनी वेगवेगळ्या वेळी आवाज उठवला किंवा तशा मोहिमा चालवल्या. मात्र हा हिरा भारताला परत देण्यासंदर्भात सरकारी पातळीवर किंवा कागदोपत्री कोणतीही दखल कधीच घेण्यात आली नाही. किंग चार्ल्स तृतीय यांनीही 2022 मध्ये परिधान केलेल्या राजेशाही मुकुटामध्येही कोहिनूर हिरा होता.
किंग चार्ल्स तृतीय यांची प्रकृती उत्तम आहे. सध्या काही काळ किंग चार्ल्स तृतीय राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. किंग चार्ल्स तृतीय यांना बरं होण्यासाठी किती कालावधी लागेल हे जाहीर करण्यात आलेलं नाही. किंग चार्ल्स तृतीय यांच्या जागी राजघराण्याचे इतर ज्येष्ठ सदस्य त्यांच्यावतीने काम पाहतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र लवकरच किंग चार्ल्स तृतीय राजकीय कामकाज पुन्हा सुरु करतील. किंग चार्ल्स तृतीय हे 75 वर्षांचे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. त्यांच्यावर आऊटडोअर पेशंट म्हणून उपचार सुरु आहेत, अशी माहिती राजघराण्याने दिली आहे.