स्वर्गात जाणाऱ्या 'हायकू स्टेअर्स' लवकरच होणार इतिहासजमा!

स्वर्गाच्या जवळपास जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या जवळपास ३ हजार ९२२ एवढी आहे

Updated: Oct 31, 2019, 11:21 AM IST
स्वर्गात जाणाऱ्या 'हायकू स्टेअर्स' लवकरच होणार इतिहासजमा!

होनूलोलू, हवाई : स्वर्ग ही रम्य कल्पना आहे. पण हवाईबेटांवर हायकू स्टेअर्स पाहून लोकांना स्वर्गाचीच आठवण येते. स्वर्गात जाणारा मार्ग वाटावा असा चार हजार पायऱ्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जाण्यास बंदी असली तरी लोकं बंदी झुगारून हायकू स्टेअर्स चढण्याचा प्रयत्न करतात. डोंगराच्या निमुळत्या टोकावरुन जाताना दिसणारी शिड्यांची पायवाट... जणू काही स्वर्गात नेणाऱ्या पायऱ्या... हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर या 'हायकू स्टेअर्स' म्हणजे पायऱ्या आहेत. 

स्वर्गाच्या जवळपास जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या जवळपास ३ हजार ९२२ एवढी आहे. या पायऱ्या चढून जाणं हे तसं आव्हान आहे. पण आजुबाजूचा निसर्ग आणि तिथलं वातावरण पाहता. स्वर्गाच्या वाटेवर एकदा जावंच असं प्रत्येकाला वाटतं.

डोंगराच्या पायथ्यापासूनच्या या शिड्या मध्येच धुक्यात हरवतात. कधी कधी तर एखादा ढगच या पायऱ्यांवर विसावलेला दिसतो. 

तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की या पायऱ्या बांधल्या कुणी? या पायऱ्या बांधल्या अमेरिकन नेव्हीनं.... १९४० साली दुसऱ्या महाय़ुद्धाच्या काळात या डोंगरावर एक रेडिओ स्टेशन बांधण्यात आलं. या रेडिओ स्टेशनद्वारे अमेरिकन नेव्हीकडून प्रशांत महासागरातल्या त्यांच्या जहाजांशी संपर्क प्रस्थापित केला जायचा. 

कालांतरानं हे रेडिओ स्टेशन बंद करण्यात आलं. पण या रेडिओस्टेशनपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. १९७० साली दररोज जवळपास ७५ पर्यटक या पायऱ्या चढून रेडिओ स्टेशनपर्यंत जायचे. पण नंतर १९८७ साली या पायऱ्यांवर जाण्यास तिथल्या प्रशासनानं बंदी घातली. 

पोलीस आणि पहारेकऱ्यांची नजर चुकवून रोज अनेक पर्यटक या स्वर्गाच्या वाटेवर जातात. २०१६ मध्ये होनूलोलूच्या स्थानिक प्रशासनानं या पायऱ्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. २०२२ पर्यंत ही स्वर्गाची वाट इतिहासजमा होणार आहे. त्यामुळं एक साहसी रस्ता कायमचा इतिहासजमा होणार आहे.