हेग : आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय.
दिलेल्या निश्चित तारीखेनुसार भारत आणि पाकिस्तानला अनुक्रमे १७ एप्रिल आणि १७ जुलैपर्यंत आपले दस्तावेज आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर सादर करायचे आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दोन्ही बाजुंचा दृष्टीकोन आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत हा निर्णय घेतलाय.
पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयानं ४७ वर्षीय कुलभूषण जाधवला हेरगिरी आणि दहशतवाद प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर मे महिन्यात भारतानं या शिक्षेविरुद्ध हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १० सदस्यीय पीठानं या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी पाकिस्ताननं सुनावलेली शिक्षा रोखली.
गेल्या २५ डिसेंबर रोजी इस्लामाबादमध्ये जाधव यांच्या आई आणि पत्नीनं त्यांची भेट घेतली होती. यानंतर पाकिस्ताननं एक व्हिडिओ जाहीर केला होता, या व्हिडिओत कुलभूषण आपल्या पत्नी-आईशी भेट करू दिल्याबद्दल पाकिस्तान सरकारचे आभार मानताना दिसत आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्ताननं जाधव यांचा आणखी एक व्हिडिओ जाहीर केला, ज्यात कथित स्वरुपात कुलभूषण दावा करताना दिसत आहेत की, 'तुरुंगात त्यांना कोणताही त्रास दिला जात नाही'. भारतानं मात्र हा व्हिडिओ म्हणजे दुष्पचार असल्याचं सांगत हा व्हिडिओ विश्वासार्ह नसल्याचं म्हटलंय.