India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. 'न्यू यॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला.
'न्यू यॉर्क टाइम्स'ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, "फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती," अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या 5 देशांचा समावेश होतो. हे पाचही देश एकमेकांबरोबर गुप्त माहिती शेअर करतात. अशाच एका माहितीच्या आधारेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. यावरुनच दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
ट्रूडोचे आरोप हे बिनबुडाचे आणि विशिष्ट हेतून प्रेरित असल्याचं भारताने म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाने तडकाफडकी निर्णय घेत भारतीय अधिकाऱ्याला देश सोडून मायदेशी जाण्याचे आदेश दिले. भारतानेही कॅनडीयन राजदूतांना बोलावून घेत 5 दिवसात देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार कॅनडीयन अधिकारी मायदेशी परतल्याचे समजते. दरम्यान भारताने कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताने केला आहे.
भारतामध्ये निर्बंध घालण्यात आलेली संस्था खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) प्रमुख हरदीप सिंग निज्जरची 18 जून रोजी ब्रिटीश कोलंबियामधील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भारताने 2020 मध्येच निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. अमेरिकेनेही कॅनडाच्या आरोपांनंतर भारताला तपासामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. 'न्यू यॉर्क टाइम्स'ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "हत्येनंतर अमेरिकेने कॅनडीयन सहकाऱ्यांना गुप्त माहिती दिली. त्यानंतर कॅनडाने यामध्ये भारताचा सहभाग असल्याचा निष्कर्ष काढला." या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, कॅनडामधील भारतीय अधिकारी या हत्येत सहभागी होते असं अमेरिकेने दिलेल्या माहितीमध्ये सूचित करण्यात आलं आहे.
कॅनडामधील अमेरिकेतील राजदूत डेव्हिड कोहेन यांनी 'सीटीव्ही न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, 'फाइव्ह आईज देशांमध्ये एकमेकांबरोबर शेअर केलेल्या गुप्त माहितीमध्ये' ट्रूडो यांना जून महिन्यामध्ये कॅनडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत असं कळवण्यात आलं. कोहनेनने टीव्ही चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, "हे सारं गुप्त माहितीसंदर्भातील प्रकरण आहे. यासंदर्भात अमेरिका आणि कॅनडामध्ये बरीच चर्चा झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे हीच खरी माहिती आहे."
'न्यू यॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडे हल्लासंदर्भातील कोणतीही माहिती नव्हती. हे त्यांनी कॅनडालाही कळवलं. आपल्याकडे काहीही माहिती असती तर आपण ती दिली असती असंही अमेरिकेने सांगितलं. बातमीनुसार, कॅनडामधील अधिकाऱ्यांनी निज्जरला एक सर्वसाधारण इशारा दिला होता. मात्र यामागे भारत सरकारचे काही लोक असतील आणि तो भारत सरकारच्या निशाण्यावर असल्याचं त्याला सांगण्यात आलं नव्हतं, असंही 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे.
कोहेन यांनी 'सीटीव्ही'ला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका असे आरोप फार गांभीर्यानं घेते. कोणतेही आरोप खरे ठरले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियमांचं हे मोठं उल्लंघन ठरेल. भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक सुदृढ व्हावेत यासाठी दिल्ली प्रयत्नशील असतानाच अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा या हल्ल्यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येणं हे दिल्लीच्या धोरणांवर परिणाम करणारं असल्याचं सांगितलं जात आहे. कॅनडा आणि भारत वादामध्ये भारत आणि अमेरिका संबंध खराब होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.