जकार्ता : इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने आलेल्या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 373 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटातून सावरत नाही त्याआधीच पुन्हा एकदा त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूवैज्ञानिकांनी ही शक्यता वर्तवली आहे. त्सुनामी ही समुद्रात भूंकप आल्याने येते पण वैज्ञानिकांच्या मते, आता ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे देखील त्सुनामी येऊ शकते हे या घटनेवरुन समोर आलं आहे. देशात एकूण 127 ज्वालामुखी सक्रीय आहेत. जे प्रशांत महासागरातील 'रिंग ऑफ फायर'मध्ये आहेत. यामध्ये अनेक स्फोट होत असतात. पण आता यामुळे त्सुनामी येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
इंडोनेशियामध्ये लष्कराचे जवान आणि कार्यकर्ते बचाव कार्यात लागले आहेत. सोमवारी ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या लोकांचा शोध सुरु झाला आहे. राष्ट्रीय आपात्कालीन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी म्हटलं की, 'या घटनेत आतापर्यंत ३७३ जणांना मृत्यू झाला आहे. तर अजूनही १२८ जण बेपत्ता आहेत. तर १४५९ लोकं जखमी झाले आहेत.
अनेक जण अजूनही बेपत्ता असल्य़ाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात येते आहे. अनाक क्राकाटोआ या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने शनिवारी स्थानिक वेळेनुसार ९.३० मिनिटांनी त्सुनामी आली होती. समुद्रात आलेल्या उंच लाटांमुळे अनेक घरं वाहून गेली. अनेकांना आपले प्राण गमावावे लागले.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी सोमवारी या भागाचा दौरा केला. अनेक कुटुंब पाण्यात वाहून गेली आहेत. ख्रिसमसनिमित्त समुद्र किनाऱ्य़ावर अनेक लोकं फिरायला आली होती. यामुळे मृतांचा आकडा वाढला.