'10 सेकंदांपेक्षा कमी वेळ छेडछाड झाली' म्हणत आरोपीची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा धक्कादायक निकाल

Judge Acquits Man As Groping Lasted Less Than 10 Secs: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला किमान तीन ते साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी असं कोर्टासमोर म्हटलं होतं. मात्र कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची मुक्तता केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 15, 2023, 10:24 AM IST
'10 सेकंदांपेक्षा कमी वेळ छेडछाड झाली' म्हणत आरोपीची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा धक्कादायक निकाल title=
या निर्णयानंतर देशभरामध्ये जोरदार विरोध होताना दिसत असून स्वत:च्याच छातीला हात लावत अनेक महिला सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आहेत.

Judge Acquits Man As Groping Lasted Less Than 10 Secs: न्यायव्यवस्था ही सर्वोच्च असते असं म्हणतात. मात्र अनेकदा न्यायाधिशांनी दिलेल्या निर्णयांवरुन वाद होतो. अनेकदा न्यायाधिसांच्या निर्णयावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली जातात. काही निर्णयांमुळे जनक्षोभ उसळल्याचं पहायला मिळतं. असाच काहीसा प्रकार सध्या इटलीमध्ये सुरु आहे. हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल. येथील एका न्यायाधिशांनी 17 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपीला निर्दोष सोडण्यामागील कारण हे फारच संतापजनक आहे. न्यायाधिशांनी दिलेल्या निकालामध्ये आरोपीने 10 सेकंदांपेक्षा कमी वेळ या मुलीची छेड काढल्याने त्याला निर्दोष मुक्त केलं जात असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणानंतर इटलीमधील तरुणांनी ऑनलाइन आंदोलन सुरु केलं आहे. अनेकांनी तर रस्त्यावर उतरुनही आंदोलनं केली आहे.

कोणीतरी आपल्याला हात लावतंय असं तिला वाटलं अन्...

'मेट्रो' वृत्तपत्राने इटलीमधील 'कोरिएरे डेला सेरा' नावाच्या वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हा छेडछाडीचा प्रकार रोममध्ये घडला. मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पीडित तरुणी आपल्या मित्राबरोबर भटकंतीसाठी गेली होती. त्यावेळेस कोणीतरी आपलं अंतवस्त्र खेचून पार्श्वभागाला हात लावत असल्याचं या तरुणीला वाटलं. या तरुणीने मागे पाहिलं असता तिच्या शाळेमधील केअर टेकर असलेला 66 वर्षीय एंटिनियो अवोला तिच्या मागे उभा होता. तिला एंटिनियो आपली छेड काढत असल्याचं पाहून धक्काच बसला. मात्र एंटिनियोने आपण तुझी गंमत करत होतो असं म्हणत या छेडछाडीचं स्वत:च समर्थन केलं.

पोलिसांनी केली तुरुंगवासाची शिफारस

या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. तपासादरम्यान एंटिनियोने चुकीच्या पद्धतीने आणि या तरुणीच्या संमतीशिवाय तिला स्पर्श केल्याचं आणि जबरदस्तीने तिला जागेवर उभं करण्याचा प्रयत्न केल्याचं मान्य केलं. मात्र आपण हे मस्करीमध्ये केल्याचंही एंटिनियोने पोलिसांना सांगितलं. आपण या तरुणीच्या गुप्तांगाला हात लावला नाही असंही एंटिनियोने म्हणाला. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर कोर्टासमोर आपली बाजू मांडताना आरोपी एंटिनियोला किमान तीने ते साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जावी असं सांगितलं. मात्र न्यायाधिशांनी एंटिनियोला दोषमुक्त केलं.

 

फोटोगॅलरी >> तरुणी स्वत:च्या छातीला हात लावत शेअर करत आहेत Video, Photos; कारण...

 

कोर्टाने निकाल देताना काय म्हटलं?

जे काही घडतं तो गुन्हा नाही. कारण हे सारं केवळ 10 सेकंदाच्या आत घडून गेलं. मनात कोणतीही वासना नसताना हा प्रकार घडला, असं अजब निरीक्षण न्यायाधिशांनी नोंवदलं. हा निकाल ऐकून तरुणीला धक्का बसला. तसेच निकालासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जात आहे. त्याचा हात माझ्या शरीरावर होता हे समजण्यासाठी काही सेकंदांचा स्पर्श पुरेसा होता. मला वाटतंय की देशातील संस्थांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. मला न्याय मिळाला नाही, अशा शब्दांमध्ये या निकालाबद्दल तरुणीने नाराजी व्यक्त केली.

10 सेकंदांचा वेळ ठरवण्याचा हक्क कोणाला?

न्यायालयाच्या या निकालाचा इटलीमध्ये जोरदार विरोध होताना दिसत आहे. सोशल मीडिया साईट्सवर बरेच तरुण, तरुणी स्वत:ची छाती पकडून किंवा पार्श्वभागाला हात लावून छेड काढत असल्याचं दाखवत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहे. हे सर्व व्हिडीओ 10 सेकंदांपेक्षा कमी काळाचे असून आमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असा उपरोधिकपणे या निर्णयाला विरोध करताना इटालियन तरुण-तरुणी सांगताना दिसत आहे. 10 सेकंदांचा स्पर्श असो किंवा अधिक छेडछाड ही छेडछाड असते असं तरुणांचं म्हणणं आहे. या मोहिमेमध्ये इटलीमधील अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत. यामध्ये चियारा पेरग्रीन, व्हाइट लोटस फेम अभिनेता पाओलो कॅमिली आणि टिकटॉक फेम फ्रान्सेस्को सिस्कोनेटी यांचा समावेश आहे. 10 सेंकदांचा वेळ निश्चित करणारे तुम्ही कोण? तुमची छेड काढली जात असताना यात सेकंदांचा हिशोब कसा लावायचा? महिलांच्या शरीराला त्यांच्या संमतीशिवाय स्पर्श करण्याचा अधिकार कोणत्याच पुरुषाला नाही. अगदी 5 सेकंदांसाठीही नाही असं फ्रान्सेस्को सिस्कोनेटीने म्हटलं आहे.