Dinosaur Shocking Discovery: हजारो कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे दोन्ही खंड एकमेकांशी जोडलेले होते असा पुरावा वैज्ञानिकांना सापडला आहे. मागील अनेक शतकांपासून जगामध्ये सध्या दिसतात तसे खंड अस्तित्वात येण्याआधी एकच मोठा जमिनीचा तुकडा खंड म्हणून अस्तित्वात होता, असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. या दाव्याला दुजोरा देणारे काही पुरावे नुकतेच वैज्ञानिकांना सापडले आहेत. विशेष म्हणजे हे पुरावे म्हणजे डायनासोरच्या पावलांचे ठसे असून ज्या पद्धतीचे ठसे अमेरिकेमध्ये सापडले आहेत अगदी तसेच सध्या सध्या हजारो किलोमीटर दूर असलेल्या आफ्रिकेतही सापडेल आहेत. यावरुनच हे अजस्र प्राणी कोणत्या एकाकाळी ज्या एकाच महाकाय जमिनीच्या तुकड्यावर वास्तव्य करत होते त्याचेच विभाजन होऊन आजचे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड तयार झाले असा अंदाज बांधता येतो. या महाकाय खंडाला गोंडवाना खंड असं नाव होतं.
दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे आज दिसणारे खंड हजारो कोटी वर्षांपूर्वीपासून हळूहळू एकमेकांपासून दूर जाऊ लागले. एक वेळ असा आला ज्यावेळी हे दोन्ही खंड केवळ एका निमुळत्या जमिनीच्या तुकड्याने जोडलेले होते. काही संशोधकांनी केलेल्या एका ताज्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की सध्याच्या ब्राझील आणि आफ्रिका खंडाच्या खोबणीत असलेल्या कॅमरॉन देशामध्ये सापडलेले डायनासोरच्या पावलांचे ठसे हे मिळते जुळते आहेत.
हे दोन्ही खंड एकमेकांपासून कायमचे वेगळे होण्यापूर्वी जो काही जमिनीचा तुकडा जोडलेला होता त्यावरुन मोठ्या संख्येनं या प्राण्यांनी दोन्ही खंडामध्ये स्थलांतर केलं. त्यामुळेच आज सापडलेले हे 12 कोटींवर्षांपूर्वीचे समुद्राच्या दोन टोकांना असलेल्या देशांमधील पायाचे ठसे एकमेकांशी साधर्म्य साधणारे आहेत.
अमेरिकेतील साऊदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक आणि हे संधोधन करणाऱ्या लुईस जेकॉब्स यांनी, "दोन्ही खंडांना जोडणारा एक फारच निमुळता जमिनीचा तुकडा होता. याच छोट्या कॉरिडोअरबद्दल आम्ही आमच्या संशोधनात बोलत आहोत," असं सांगितलं. अंतरराष्ट्रीय स्तरावरील या संशोधकांनी शाकाहारी तसेच तीन तळवे असलेल्या डायनासोरच्या पायांच्या ठशांचा माग काढला. त्यांना ब्राझील आणि कॅमेरॉन या दोन्ही देशांमध्ये आढळून आलेले पावलांचे ठसे जवळपास सारखेच निघाले. तुम्हीच पाहा हे ठसे...
(डावीकडे ब्राझील तर उजवीकडे कॅमेरुनमध्ये सापडलेले डायनसोरच्या पावलांचे ठसे, फोटो - Southern Methodist University)
सध्या हे दोन्ही देश एकमेकांपासून 5954 किलोमीटर दूर असून या दोघांमध्ये दक्षिण अटलांटिक महासागर आहे. या संशोधनाचा अहवाल 'न्यू मॅक्सिको म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्ट्री अॅण्ड सायन्स'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.