वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. 8 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर जवळपास 50 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी खूप मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमेरिका कदाचित पुन्हा कधीही जागतिक आरोग्य संघटनेला अर्थसहाय्य करणार नाही, 'जर गरज भासली तर ते आरोग्यावर आपली एक जागतिक संस्था तयार करतील.'
कोरोनाच्या बाबतीत चीनला पाठिशी घातल्याचा आरोप करत अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला निधी देणे बंद केले आहे. आता माईक पोम्पीओ यांनी त्यापेक्षा आणखी आक्रमक भूमिकेचे संकेत दिले आहेत.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत माईक पोम्पीओ म्हणाले की, 'आता जागतिक आरोग्य संघटनेत नेतृत्व बदलण्याची वेळ नाही, तर संघटनेतच बदल करण्याची वेळ आली आहे. अमेरिका या संघटनेत परत येणार नाही.'
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की, 'जर संस्था योग्य प्रकारे कार्य करत असेल तर आम्ही त्यात सामील होण्याचा विचार करू शकतो. परंतु आता आम्ही जगातील आमच्या सहकाऱ्यांसह अशा संरचनेवर कार्य करू जे योग्य नेतृत्व देऊ शकेल.'
विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका सर्वाधिक निधी देते. जो डब्ल्यूएचओच्या एकूण बजेटच्या पंधरा टक्के असतो. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निधी थांबवण्याची घोषणा केली. डब्ल्यूएचओने असे न करण्यासाठी अनेक वेळा आवाहन केले, परंतु डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावर कायम आहेत.
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 8 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली असून जवळपास 50 हजार लोकांनी आपले प्राण गमवले आहेत. तर यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट येणार आहे.