NASA News : धकाधकीच्या जीवनात अनेकदा काही प्रसंग असेही येतात जेव्हा गर्दीपासून, वर्दळीपासून दूर जाण्याची इच्छा होते. क्षणिक का असेना, पण ही इच्छा अनेकांच्याच मनात आजवर डोकावून गेली असेल. अशाच एकांत आणि शांततेच्या शोधात असणाऱ्या मंडळींच्या मनाचा ठाव घेणारं आणि प्रत्यक्ष जगापासून कैक मैल दूर असणारं एक दुर्गम ठिकाण नुकतंच जगासमोर आणलं आहे.
NASA नं नुकतंच एक दुर्गम बेट प्रकाशझोतात आणलं असून, या बेटाचे सुरेख फोटोही शेअर केले आहेत. लँडसेट 9 च्या मदतीनं टीपण्यात आलेल्या या फोटोंमध्ये दिसणाऱ्या या बेटाचं नाव आहे ट्रिस्टन दा कुन्हा. नासाच्या या फोटोपैकी पहिल्या दृश्यामध्ये अतिशय खोल समुद्रात चारही बाजूंनी वेढलेलं एक साधारण त्रिकोणी आकारंच बेट पाहायला मिळत आहे. यापैकी मोठं बेट हे काही अंशी बर्फाच्छादित असून, इथं बर्फही स्पष्टपणे दिसत आहे.
एडिनबर्ग ऑफ़ द सेवन सीज असं लोकेशन या बेटावर टॅग करण्यात आलं आहे. हे बेट दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून साधारण अर्ध्यावर स्थिरावलं आहे असं सांगितलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे हे बेट इतक्या दूरवर आहे, की इथं असणारी लोकवस्ती येथील सागरी पक्ष्यांच्या आकड्याहून कैक पटींनी कमी आहे. सदर बेटाच्या चारही बाजुंना घनदाट जलपर्णींचा वेढा असून, त्यामध्ये कॅस्प, मायक्रोसिस्टीस आणि अशा इतरही काही सागरी शेवाळांचा समावेश आहे.
जगाच्या एका टोकाशी असणारं हे बेट पाहताना अनेकजण अवाक् झाले असून, काहींनी या बेटावरच जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुम्हाल आवडेल का, या दुर्गम बेटाची सफर करायला?