मुंबई: अंगावर टॅटू गोंदवून घेणे ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. सुरुवातीला हातापायापर्यंत मर्यादित असलेले टॅटू नंतरच्या काळात शरीरभर पसरल्याचेही आपण पाहिले असेल. मात्र, आता टॅटूच्या दुनियेत एक नवा ट्रेंड येऊ पाहत आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते ही हौस म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे.
सध्या न्यूयॉर्कमध्ये डोळ्यांच्या बुब्बुळांवर टॅटू काढण्याचा नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये डोळ्यांमधील बुब्बुळावर रंग भरले जातात. त्यामुळे डोळ्यातला पांढरा भाग पूर्णपणे रंगीत होतो. हा टॅटू काढण्यासाठी थोडा-थोडका नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये इतका खर्च येतो. डोळ्यांमध्ये इंजेक्शन देऊन हे टॅटू गोंदवले जातात.
डोळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर तब्बल दोन महिने व्यक्तीला अंधाऱ्या खोलीत राहावे लागते. कारण हे इंजेक्शन दिल्यानंतर डोळ्यांना थोडाही उजेड सहन होत नाही. याशिवाय, दोन महिने डोळ्यातून सतत पाणी येत राहते व काहीच दिसतही नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये आय टॅटूमुळे अनेकांनी डोळे गमावलेत. त्यामुळे काही देशांमध्ये आता या आय टॅटूवर बॅन करण्यात आलाय.