मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची कन्या इव्हान्का ट्रम्प या दोघींपेक्षाही शक्तिमान आहेत, अस फोर्ब्ज मॅगझीन सांगतं आहे. फोर्ब्जने अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात शक्तीमान १०० महिलांच्या यादीत देशाच्या अर्थमंत्री सीतारमण यांना ३४वं स्थान मिळालं आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसऱ्या या ४० व्या आणि इव्हान्का ट्रम्प यांना या यादीत ४२ व्या क्रमांकावर आहेत.
इतकंच नाही तर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रेन यांनाही सीतारमण यांनी मागे टाकलं आहे. रोशनी नाडर मल्होत्रा आणि किरण मुझुमदार शॉ यांनाही या यादीत अनुक्रमे ५४ आणि ६१वं स्थान मिळालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर भारतीय अर्थव्यवस्थेवरुन टीका ही होत आहे. आर्थिक मंदी आणि जीडीपी रेट कमी झाल्याने महागाई हा चिंतेचा विषय बनला आहे. अर्थमंत्री सीतारमण यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कांद्याच्या भाव वाढीवर निर्मला सीतारमण यांचं संसदेतील एक वक्तव्य देखील त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. आपण कांदा, लसून खात नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.