North Korea Missile Launch: एकिकडे भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नं अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यात प्रवेश केला असून, ते चौथी कक्षा बदलणार आहे. त्यामुळं भारतासोबतच जागतिक स्तरावरही अनेकांच्याच नजरा इथं लागल्या आहेत. असं असतानाच संपूर्ण जगाला खडबडून जागं करणारी आणखी एक घटना घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कारण, किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख केल्यामुळं संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे.
जपानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टीक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडूनच यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेकडूनही सदर घटनेला दुजोरा देणारं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं. जिथं उत्तर कोरियानं पूर्व समुद्र किनाऱ्यावरून बॅलिस्टीक क्षेपणास्त्र डागल्याचं सांगण्यात आलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 'उत्तर कोरियानं सोमवारी रात्रीच्या सुमारास पूर्व समुद्र किनाऱ्यावरून दोन बॅलिस्टीक क्षेपणास्त डागले. तिथे दक्षिणेकडे अमेरिकेच्या अण्वस्त्र सुसज्ज पाणबुडीनं नौदलाचा तळ गाठल्यानंतर काही तासांच ही क्षेपणास्त्र डागण्यात आली.'
जपानच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाकडून या क्षेपणास्त्राचा मारा करण्यात येईल अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. ज्यानंतर त्यांच्याकडूनही या घटनेमागे उत्तर कोरियाच असल्याचा सूर आळवला गेला. मागील आठवड्यामध्ये जवळपास दोन वेळा उत्तर कोरियानं बॅलिस्टीक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
हल्लीच अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये लष्करी स्तरावर बऱ्याच चर्चा झाल्या ज्यामुळं उत्तर कोरियाचा तिळपापड झाला. तसेच या क्षेत्रासंदर्भातील धोरणं आणि इतर हलचाली आम्हाला अण्वस्त्रांचा वापर करण्यास भाग पाडू शकतात, असंही दक्षिण कोरियाने म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचा हा धमकी वजा इशारा केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगासाठी धोक्याचा ठरु शकतो.
बॅलिस्टीक क्षेपणास्त्र म्हणजे अशी क्षेपणास्त्र ज्यांचा मार्ग अर्धचंद्राकार असतो. थोडक्यात जेव्हा जेव्हा या क्षेपणास्त्राचा मारा केला जातो तेव्हा ते मूळ स्थितीपासून 45 अंशांच्या कोनावर वरील बाजूस जातं आणि नंतर गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते खाली कोसळतं. हा क्षेपणास्त्रांचा आकार प्रचंड मोठा असतो. असं असतानाही जमिनीरून, हवेतून, पाण्यातून शत्रूवर मारा करता येतो. या क्षेपणास्त्रातून अणुबॉम्बही नेणं शक्य असतं.