Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून देत घडवून आणलेल्या या स्फोटात 130 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जुम्मे का दिन म्हणजेच शुक्रवार असल्याने मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाच हा हल्ला झाल्याने मृतांची संख्या वाढल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानमधील मशिदीमध्ये घडलेल्या या स्फोटांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचाच हात असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानमधील लष्कर देशातील लोकांच्या जीवावर उठण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सत्तासंघर्षामध्ये पाकिस्तानी लष्कराचा रक्तरंजित इतिहास पाहता शुक्रवारी झालेला हल्ला हा एका कटाचा भाग असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने जेव्हापासून पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे तेव्हापासून या देशातील दहशतवादी अधिक सक्रीय झाले आहेत. या दहशतवादी संघटनांनी पत्रक जारी करुन इशारे देण्यासही सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी प्रचारसभांचं आयोजन करु नये असं दहशतवादी संघटनांचं फर्मान आहे. असं केल्यास आम्ही हल्ले घडवून आणू असा इशारा या संघटनांनी दिला आहे. एका दहशतवादी संघटनेनं तर पाकिस्तानमधील लोकांना निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये सहभागी होऊ नये असं सांगितलं आहे. अशा प्रचारसभांमध्ये सहभागी झालात तर तुमचेही प्राण जाऊ शकतात असंही दहशतवादी संघटनांनी सांगितलं आहे. पाकिस्तानच्या सरकारलाही सध्या देशात सार्वत्रिक निवडणुका होऊ नये असं वाटत आहे. सध्याची देशांतर्गत सुरक्षेची स्थिती आणि आर्थिक परिस्थिती ही सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी अनुकूल नसल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे.
पाकिस्तानमधील जनतेला सरकार सध्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सध्या देशात सार्वजनिक निवडणूक घेता येणार नाही. मागील 3 ते 4 दिवसांपासून पाकिस्तानमध्ये अपहरणाच्या अनेक बातम्या चर्चेत आहेत. मात्र या खोट्या बातम्या पाकिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक योग्य नसल्याचं दाखवण्यासाठी पेरल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी दहशतवाद्यांचीही मदत घेतली जात आहे. अगदी पाकिस्तानी लष्करीही यामध्ये सहभागी आहे. देशातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट असल्याचं भासवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी लष्करी यंत्रणांच्या माध्यमातूनच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या अंतर्गत तपासामध्ये पाकिस्तीनचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची लोकप्रियता अजून कमी झालेली नाही. त्यामुळेच आता निवडणुका पार पडल्या तर निवडणुकीचे निकाल इम्रान खान यांच्या बाजूने लागतील अशी भीती पाकिस्तानी लष्कराबरोबरच आयएसआयला आहे. या दोघांचाही इम्रान खान यांना विरोध आहे.
पाकिस्तानमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांच्या मदतीने पाकिस्तानी लष्करानेच देशातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्याचा कट रचला आहे. याअंतर्गतच दहशतवादी संघटनांनी 29 सप्टेंबरला देशात 4 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये अनेक निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांचं लक्ष केवळ हे हल्ले आणि त्यासंदर्भातील आरोप प्रत्यारोपांकडे वेधून घेण्यासाठी आणि निवडणुकीच्या मूळ मुद्द्यावरुन भरकटवण्याचा सरकारचा आणि पाकिस्तानी लष्कराचा इरादा आहे. तसेच या हल्ल्यांच्या माध्यमातून देशातील परिस्थिती चिंताजनक असून सध्या निवडणुका घेता येणार नाहीत, असं पाकिस्तानी निवडणूक आयोगाला वाटावं आणि त्यांनी निवडणूक पुढे ढकलावी यासाठी सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. 29 सप्टेंबरच्या हल्ल्यांची जबाबदारी लवकरच एखादी दहशतवादी संघटना घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.