इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. यामुळे पाकिस्तानी तज्ज्ञांची २० जणांची टीम जगावर लक्ष ठेवणाऱ्या एफएटीएफ म्हणजेच फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सचं मन वळविण्यासाठी बँकॉकला रवाना झाली आहे.
पाकिस्तानला आधीच ग्रे यादीमध्ये टाकण्यात आलंय. काळ्या यादीत टाकण्यासाठी १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या संकटापासून वाचवण्यासाठी पाकिस्तानचे मंत्री हम्माद अजहर यांच्या नेतृत्वाखाळी २० जणांची टीम बँकॉकला रवाना झाली आहे. त्यात पाकिस्तानच्या विविध खात्यांचे अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
१३ सप्टेंबरपर्यंत यासंदर्भात चर्चा चालण्याची शक्यता आहे. एफएटीएफच्या आशिया-प्रशांत गटानं आधीच पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलंय. त्यामुळे पाकिस्तानला दर तीन महिन्याला या गटाला अहवाल द्यावा लागत आहे.