इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी हाफिज सईदबरोबर निवडणूकीत युती होण्याच्या शक्यतेकडे इशारा केलाय.
अलिकडेच परवेज मुशर्रफ यांनी दहशतवादी गट लष्कर - ए- तयब्बा आणि जमात - उद - दावाह यांना पाठिंबा दिला होता. जर २०१८ च्या निवडणूकीत हाफिज सईद बरोबर युती झाली तर आपण त्याचं स्वागतच करू असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. "आज" या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अजून आमच्यात यासंबंधी काही बोलणं झालेलं नसलं तरी अशाप्रकारच्या युतीचं मी स्वागतच करेन.
गेल्या महिन्यातच परवेज मुशर्रफ यांनी एका भव्य युतीची घोषणा केली होती. दोन डझन पक्ष असणाऱ्या या युतीत सुन्नी तेहरिक, मजलिस-ए-वहातुल मुसलमीन, पाकिस्तान अवामी तेहरिक आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (मुशर्रफ याचे अध्यक्ष आहेत) यांचा समावेश होता. याखेरीच बऱ्याचशा पक्षांनी यापासून लांब राहणंच पसंत केलं.
हाफिज सईदचा पाकिस्तानच्या धार्मिक गटांमध्ये प्रचंड प्रभाव आहे. जमात - उद - दावाहने मिली मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना केली आहे. परंतु पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या पक्षाला मान्यता दिलेली नाही. हाफिज सईदने तो कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे मात्र स्पष्ट केललं नाही.