Philippines Earthquake : (Turkey Earthquake) तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपातून देश अद्यापही सावरलेला नाही. अनेक भागांमध्ये असणारे मोठमोठ्या इमारतींचे ढिगारेही तसेच आहेत. तितक्यातच आता आणखी एका भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. फिलिपीन्समध्ये मंगळवारी आलेल्या या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा भूकंप आला. याचा केंद्रबिंदू मिंदानाओ बेटांवर दवाओ डे ओरो या प्रांतात होता. सदर घटनेनंतर मारगुसन आपत्ती व्यवस्थापन कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या इथं राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालं आहे का याबाबतची पाहणं काही पथकं करत आहेत.
अद्यापही या भूकंपामुळं नेमकं नुकसान किती झालं याची माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरीही भूकंपाची एकूण तीव्रता पाहता झालेलं नुकसान मोठं असेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी, म्हणजेच साधारण 16 फेब्रुवारीला फिलिपीन्सच्या मसबाते क्षेत्रात 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. पण, त्यानंतर कोणतंही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर नव्हती. शिवाय त्सुनामीचाही इशारा देण्यात आला नव्हता. ज्यामुळं नुकसानाचा एकूण आकडा समोर आलाच नव्हता.
USGS च्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू मसबाते या मुख्य बेटाच्या उसोन नगर पालिकेतील मिआगानजीक असणाऱ्या गावापासून 11 किमी दूर होतं. सध्या मंगळवारी आलेल्या भूकंपामुळं नेमकं किती नुकसान झालं आहे याची आकडेवारी प्रतिक्षेत आहे.
दरम्यान, तुर्कीत आलेला आणि हजारोंचा बळी घेणारा भूकंप आणि त्यामागोमागच जगातील विविध भागांमध्ये आलेले भूकंप पाहता भूगर्भशास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.
तुर्कीत आलेल्या भूकंपामध्ये 55 हजारहून अधिक निष्पाप बळी गेले. ज्यानंतर संपूर्ण जगात आणि भारतातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळालं. भारतात केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार साधारण 59 टक्के भूखंड अतिसंवेदनशील प्रवर्गात मोडत असल्यामुळं चिंता वाढली आहे. देशातील गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, बिहार, जम्मू काश्मीर , अंदमान निकोबार ही क्षेत्र झोन 5 मध्ये येत असून इथं जास्त तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो.